गोविंदा आला रे...
By Admin | Updated: August 26, 2016 02:51 IST2016-08-26T02:51:57+5:302016-08-26T02:51:57+5:30
इतवारा नवयुवक मंडळातर्फे पुरुष आणि महिला पथकांसाठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

गोविंदा आला रे...
नागपूर : इतवारा नवयुवक मंडळातर्फे पुरुष आणि महिला पथकांसाठी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आसपासच्या परिसरातून हजारो लोक दहीहंडीच्या उत्साहात सहभागी झाले होते. गोविंदा आला रे..., हर तरफ है ये शोर...,अशा गीतांवर डीजेचे संगीत लोकांचा उत्साह वाढवित होते. यात दहीहंडीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोविंदांवर कार्यकर्त्यांकडून पाण्याचा वर्षाव होत होता.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार अविनाश पांडे, आभा पांडे, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, सतीश हरडे, अतुल लोंढे, राजेश छाबरानी, विनोद इंगोले, रामभाऊ अंबुलकर, कुणाल गडेकर यांच्यासह मंडळाचे संजय खुळे, अभिषेक लुनावत प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन समारंभ पार पडताच उंच साहसाचा हा उत्साही खेळ सुरू झाला. पोलीस प्रशासनाकडून हंडीच्या आयोजनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार याबाबत सतर्क होते. तहसिलचे ठाणेदार संतोष खांडे यांनी सांगितले की, इतवारी नवयुवक मंडळाची दहीहंडी ही २० फुट होती. नियमातही हंडी न फुटल्याने उंची कमी करण्यात आली.
महिलांमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने मारली बाजी
स्पर्धेमध्ये महिलांच्या पाच चमू सहभागी झाल्या. यामध्ये रामनगर देहरी क्लब रामपूर दमोह, मध्यप्रदेश, साईबाबा स्पोर्टस् क्लब, सोनेगाव, खामला, जयदुर्गा क्रीडा उत्सव मंडळ, सोनेगाव खामला, राधाकृष्ण महिला मंडळ न्यू सोनेगाव व कासीम कल्याणी मंडळ हिंगणाचा समावेश होता. महिला पथकांसाठी दहीहंडी २० फुटावर ठेवण्यात आली. महिला पथकांनी चारवेळा प्रयत्न केले. हंडी १६ फुटावर आल्यानंतर चौथ्या राऊंडमध्ये पहिल्याच प्रयत्नात न्यू सोनेगावच्या राधाकृष्ण महिला मंडळाच्या चमूने दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. विजेत्या चमूला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. हंडी फोडण्याचा मान निकिता झोटिंग हिने पटकाविला.
पुरुषांमध्ये जय माँ काली मंडळ विजेते
पुरुष गटांमध्ये ११ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जय भोलेश्वर क्रीडा मंडळ सोनझरी, जय माँ शीतला नृत्य कला मंडळ धम्मदीपनगर, जय माँ काली क्रीडा मंडळ बिडीपेठ, गोल्डन स्पोर्टींग क्लब जुना बगडगंज, राधाकृष्ण मंडळ न्यू सोनेगाव, साईबाबा स्पोर्टस् क्बल, सोनेगाव, जय दुर्गा क्रीडा उत्सव मंडल, सोनेगाव, फ्रेंडस ग्रुप, धामणगाव, जय माँ शीतला भोजपूर, भंडारा, जय शीतला माता ग्रुप, भंडारा व जय श्रीराम क्रीडा मंडळ सहभागी झाले होते. पुरुष गटासाठी दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्यात आली होती. ही उंची नंतर एक फुट कमी करून १९ फुटावर आणण्यात आली. यावेळी जय माँ काली क्रीडा मंडळ सोनझरीचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यात यशस्वी ठरले. विजेता पथकाला २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दहीहंडी फोडण्याचा मान प्रभाकर रोहणकर या गोविंदाने पटकाविला. (प्रतिनिधी)
गोविंदा जखमी
दही हंडी फोडण्याचा प्रयत्नात पुरुष व महिला गोविंदा जखमी झाले. एका पथकाच्या सर्वात वरती चढलेल्या गोविंदाने प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन केले व तेथूूनच खाली कोलांडउडी घेतली. या प्रयत्नात त्याचा पाठीला व जबडयाला मार बसला. त्याला लगेच तेथे उपलब्ध असलेल्या अॅम्बुलमध्ये नेऊन उपचार करण्यात आले. तर एका महिला गोविंदाचे पथक तीसऱ्या थरापर्यंत पोहचले असताना मनोरा कोसळला व एका महिला गोविंदाचा पाय मुरगळला.