नागपूर : : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या जीवघेण्या आगीच्या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरदेखील गुन्हा दाखल झालेला नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील या ठिकाणी भेट दिल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घटनास्थळी जाणार आहेत. मंगळवारी त्यांचे नागपुरात आगमन झाले व ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देणार आहेत. राज्यातील सर्वच ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांनी भेट दिली असताना आता राज्यपाल आल्यानंतर तरी या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१२ ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यपालांचा नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौरा नियोजित होता. परंतु भंडारा येथील ह्रदयद्रावक घटनेनंतर त्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. ते सकाळी भंडाऱ्याकडे रवाना होतील.
परत पायघड्या अंथरणार का ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे भेट दिली असता प्रशासनाची जी हुजूरी दिसून आली होती. संपूर्ण समाजाच्या मनात आक्रोश असताना अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी चक्क पायघड्या अंथरल्या होत्या व त्यांना ठेच लागू नये यासाठी ‘ग्रीन कार्पेट’ अंथरले होते. आता राज्यपालांच्या भेटीदरम्यानदेखील असाच असंवेदनशील कारभार होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
महापौर, विभागीय आयुक्तांकडून स्वागत
दरम्यान, राज्यपालांच्या स्वागतासाठी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) महानगर आयुक्त शीतल तेली-उगले, नागपूर शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर प्रामुख्याने उपस्थित होते.