राज्यपालांनी घेतली विकास कामांची माहिती
By Admin | Updated: November 8, 2014 02:48 IST2014-11-08T02:48:21+5:302014-11-08T02:48:21+5:30
तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे ...

राज्यपालांनी घेतली विकास कामांची माहिती
नागपूर: तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे राजभवनावर विदर्भातील विविध विकास कामांची माहिती घेतली. सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामावर भर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे ४ तारखेला विदर्भ दौऱ्यासाठी नागपूरमध्ये आगमन झाले. ५ तारखेपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. दोन दिवस अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केल्यावर आज राजभवनावर त्यांनी विदर्भातील विविध विकास योजनांच्या १४ मुद्यांवर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून अधिकाऱ्यानी त्यांना ही माहिती दिली. त्यात प्रामुख्याने प्रामुख्याने मिहान, गोसेखुर्द प्रकल्पांसह सिंचन योजना व नागपूर विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
राज्यपालांनी सुरुवातीला मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. जयताळा व शिवणगाव येथील नागरिकांचा भूसंपदानास विरोध असल्याने अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्याकडून यावेळी सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयात प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रश्नही कमी अधिक प्रमाणात मिहानसारखाच आहे. पुनर्वसन आणि भूसंपादनास उशीर होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नागपूर विभागात ७३ प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे. यावर १२३४ कोटीचा अतिरिक्त निधी लागणार आहे. यास मंजुुरी मिळाल्यास ४६ हजार हेक्टरमध्ये सिंचन क्षमता वाढणार असल्याचे सांगण्यात आले. सिंचनाचे अनेक प्रकल्प वन खात्याच्या परवानगीसाठी अडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांना वन संरक्षण अधिनियमातून सूट देण्यात यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
राज्यपालांनी स्वच्छाता मोहिमेचाही आढावा घेतला. त्याच प्रमाणे वन हक्क कायद्याची माहिती घेतली. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रमावर भर देण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, मिहान व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)