शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या, संरक्षणाचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 24, 2015 02:12 IST2015-07-24T02:12:55+5:302015-07-24T02:12:55+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.

शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या, संरक्षणाचे सर्वेक्षण
जिल्हाधिकारी कार्यालय : अनावश्यक त्रास देणाऱ्यांचा शोध
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून एक प्रश्नावली भरुन घेण्यात आली. यातून अनावश्यक त्रास देणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभाग प्रमुख महिला कर्मचाऱ्यांना त्रास देतात. अशा वावड्या उठविण्यात आल्या होत्या. ही बाब जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापर्यंत पोहोचली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून याबाबत एक प्रश्नावली भरुन घेतली. घरुन आॅफीसमध्ये येतात आणि जाताना कोणी कमेन्ट पास करतो काय, अशा स्वरूपाचे प्रश्नही विचारण्यात आले. या पेक्षा काही गोष्टी सर्वांसमोर सांगण्यासारख्या नसतील तर त्या वैयक्तिक भेटून चर्चा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केले.
या प्रश्नावलीमध्ये महिला कर्मचाऱ्याचे नाव, पद, कार्यरत विभाग, विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी अशी सर्व माहिती नमूद करणे आवश्यक होते.
निवडणूक विभाग, निवासी उपजिल्हाधिकारी कक्ष, भूसंपादन विभाग, पुरवठा विभाग, नगर प्रशासन विभाग, रोजगार हमी योजना कक्ष यासह सर्व कक्षात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून ही प्रश्नावली भरून घेण्यात आली. कोणताच त्रास नसल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी नमूद केल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)