सरकार परतणार अन् निवडणूक रंगणार

By Admin | Updated: November 25, 2015 07:03 IST2015-11-25T07:03:50+5:302015-11-25T07:03:50+5:30

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ७ डिसेंबर पासून ते साधारणत: २४ डिसेंबरपर्यंत ‘सरकार’चा नागपुरात

The government will return and the elections will be played | सरकार परतणार अन् निवडणूक रंगणार

सरकार परतणार अन् निवडणूक रंगणार

नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ७ डिसेंबर पासून ते साधारणत: २४ डिसेंबरपर्यंत ‘सरकार’चा नागपुरात मुक्काम असेल. अधिवेशन संपताच सरकार मुंबईला रवाना होईल. अधिवेशनाची धामधूम शांत होईल अन् विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची रंगत चढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यात होत असलेली ही निवडणूक दोन्ही नेते अतिशय गांभीर्याने घेतील यात शंका नाही. भाजपमध्ये इच्छुकांची रांग मोठी असली तरी दोन्ही नेत्यांच्या समन्वयातूनच उमेदवार ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र मुळक यांच्याशिवाय दुसरे मोठे नाव चर्चेत नाही.
२७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विजयी होणाऱ्या उमेदवाराला थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन जोरात करण्याचा योग आहे. मंगळवारी निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवार बऱ्यापैकी सक्रीय झाले. मतदारांनी इच्छुक उमेदवारांना फोन करून उमेदवारीसाठी शुभेच्छाही दिल्या. सर्वाधिक फोनाफानी भाजपमध्ये झाली. उमेदवारीसाठी असलेली स्पर्धा पाहता भाजप नेत्यांनाही विचारपूर्वक निर्णय घ्याला लागणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरलेले माजी आ. अशोक मानकर यांना फक्त चार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यावेळी भाजपचे संख्याबळ तब्बल ५८ ने जास्त होते. मात्र, मानकर यांंच्यासोबत पक्षांतर्गत मोठा दगाफटका झाला. काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा गनिमीकावा कामी आला. विशेष म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकीत मानकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांना काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाी पराभूत केले होते.
एकूण मतदार ५८१
या वेळी नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या सदस्यांना मताधिकार देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात मौदा, महादुला, हिंगणा, कुही व भिवापूर या पाच नगर पंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. येथे प्रत्येकी १७ सदस्य आहेत. त्यामुळे नगर पंचायतीचे ८५ सदस्य वाढले. कन्हान व वाडी या दोन नगर परिषदा स्थापन झाल्या. कन्हानमध्ये २५ तर वाडीमध्ये १७ सदस्य आहेत. यांची एकूण ४२ मतांची भर पडली आहे. याशिवाय नगर परिषद व मौदा, महादुला या नगर पंचायतीमधील नामनिर्देशित सदस्य असे एकूण २९ सदस्यांना मताधिकार दिला जाणार आहे. ही सर्व गोळा बेरीज करता मतदारसंख्या ५८१ वर पोहचेल

Web Title: The government will return and the elections will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.