उद्योगांच्या मदतीसाठी सरकार तत्पर
By Admin | Updated: November 15, 2015 02:01 IST2015-11-15T02:01:03+5:302015-11-15T02:01:03+5:30
उद्योग उभारून युवकांना रोजगार देण्याचे धोरण उद्योजकांनी ठेवावे. त्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी येथे केले.

उद्योगांच्या मदतीसाठी सरकार तत्पर
कृपाल तुमाने यांचे प्रतिपादन : नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे दिवाळी संमेलन
नागपूर : उद्योग उभारून युवकांना रोजगार देण्याचे धोरण उद्योजकांनी ठेवावे. त्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी येथे केले.
नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे (एनसीसीएल) दिवाळी संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये शनिवारी करण्यात आले. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात रा.स्व.संघाचे संघचालक (महानगर) राजेश लोया, एनसीसीएलचे अध्यक्ष कैलास जोगानी, सचिव प्रदीप जाजू, उद्योजक प्रवीण तापडिया, धर्मपाल अग्रवाल, इस्माईल शेख, एनसीसीएलचे माजी अध्यक्ष कमलेश शाह हजर होते.
तुमाने म्हणाले, उद्योग क्षेत्राचा विकास होत आहे. त्याचे मूर्त स्वरूप लवकरच दिसेल. राज्याच्या सहकार्याने मॉयलचा फेरो अॅलॉयचा एक हजार कोटीचा प्रकल्प रामटेक क्षेत्रांतर्गत येत आहे. त्यामुळे युवकांना रोजगार आणि छोट्या उद्योगांना काम मिळेल. शेतकी उत्पादनाचे भाव वाढले, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, अशी टीका त्यांनी केली. समस्या सांगा, त्यावर तोडगा काढू, असे आवाहन त्यांनी केले.
राजेश लोया म्हणाले, ज्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल, अशांचा सत्कार आहे. व्यापाऱ्यांनी व्यापारी धर्माचे पालन केल्यास ते यशस्वी ठरतील. व्यापाऱ्यांना बाहेर पुरस्कार मिळतात, पण स्थानिकांकडून मिळणे कठीण असते. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांची सेवा करावी.
मान्यवरांचा सत्कार
दिवाळी संमेलनात उद्योजक प्रवीण तापडिया, व्यापार क्षेत्रातील धर्मपाल अग्रवाल आणि सेवा क्षेत्रातील मोहम्मद इस्माईल शेख यांचा सत्कार राजेश लोया आणि कैलास जोगानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष घनश्याम पनपालिया, राधाकिशन पुनियानी, संतोष अग्रवाल, मोहन मेहाडिया, कमल चोपडा, भागीरथ मुरारका, कमलेश शाह, महेंद्र कटारिया यांचा चेंबरच्या विकासात यशस्वी सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय चेंबरच्या परंपरेनुसार विभिन्न व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रकाश मेहाडिया, जयप्रकाश पारेख, कीर्ती अग्रवाल, बागडिया, राजेश भदोरिया, सुनील बजाज, जवाहरलाल चूग, वासुदेव सावलानी, अनिल पारेख, आर.के. वर्मा, पुरुषोत्तम ठाकरे, प्रकाश त्रिवेदी, उमेश पटेल, सदाशिव महाजन, रामकिशन खंडेलवाल, प्रदीप मेहाडिया, रामअवतार अग्रवाल, रामकिशन गुप्ता, विनोद गर्ग, अशोक कोठारी यांचा चेंबरतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी कैलास जोगानी यांनी चेंबरची रूपरेषा, विविध उपक्रम आणि विकासात्मक कामांची माहिती दिली. संचालन महेंद्र कटारिया यांनी केले. (प्रतिनिधी)