राज्यातील सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वातच : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:34 IST2019-11-07T21:33:14+5:302019-11-07T21:34:12+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चाही पसरली मात्र गडकरी यांनी स्वत: ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार बनेल, असे स्पष्ट केले.

राज्यातील सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वातच : नितीन गडकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना यांच्यात ओढाताण सुरु आहे. यातच सरकार स्थापण्याच्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चाही पसरली मात्र गडकरी यांनी स्वत: ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार बनेल, असे स्पष्ट केले.
मुंबईमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राजकारण चांगलेच तापले आहे. यातच केंद्रीय मंत्री गडकरी यांना भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जात आहे. असे सांगितले जाते की, गडकरी हे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढतील. या सर्व चर्चा सुरु असतानाच गुरुवारी सकाळी गडकरी यांचे नागपुरात आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, राज्यात लवकरच सरकार स्थापन होण्याबाबत स्थिती स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला राज्यात सरकार बनवण्यासाठी जनादेश मिळाला आहे. महायुती फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनवेल. शिवसेना लवकरच भाजपला समर्थन देण्याची घोषणा करेल, असेही गडकरी यांनी सांगितले.
रा.स्व.संघाचा सरकार स्थापण्याशी काहीही संबंध नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्यापूर्वी गडकरी यांनी स्पष्ट केले की, संघाचा सरकार स्थापन करण्यात कुठलाही संबंध नाही. संघ याचाही संबंधही ठेवत नाही. महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याशी डॉ. भागवत यांना जोडले जाऊ नये.