लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गामुळे शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची सरकारने दखल घ्यावी व त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी शहरातील मानवाधिकार संघटनेने केली आहे. यासंबंधात मुख्यमंत्री कार्यालय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
शहर कॉंग्रेसच्या मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र पाठविले. शहरातील मनोरुग्णालयातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बाधित झाले आहेज. मात्र आरोग्य विभागाने काहीच पावले उचललेली नाहीज. १० मार्चपासून आतापर्यंत रुग्णालयात उपचार करणारे साडेचारशेपैकी १२५ हून अधिक मनोरुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. संसर्गाचा वेग जास्त असतानादेखील रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक कारवाई केलेली नाही.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे उत्तर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. प्रभावी पावले उचलण्याच्या नावाखाली केवळ काही रुग्णांना आयसोलेट करण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीच होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.