सरकारने त्वरित द्यावा
By Admin | Updated: April 9, 2017 02:38 IST2017-04-09T02:38:24+5:302017-04-09T02:38:24+5:30
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली असून,

सरकारने त्वरित द्यावा
दीक्षाभूमीचा विकास निधी
बुद्धिस्ट सर्किटसाठीही प्रयत्न अपुरे : सुलेखा कुंभारे यांची मागणी
नागपूर : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली असून, त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. अ दर्जाच्या मानकानुसार विकास करण्यासाठी आवश्यक निधीची शिफारसही केंद्राकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत विकासाचा कुठलाही निधी केंद्र सरकारकडून आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाकडे लक्ष देउन तातडीने दीक्षाभूमीचा विकास निधी वळता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी केली.
शनिवारी त्यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. दीक्षाभूमी हे जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी एक पवित्र स्थान आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायी दरवर्षी येथे भेट देतात. त्यामुळे दीक्षाभूमीला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्यानुसार विकास करणे गरजेचे आहे. अनेक देशांतील स्कॉलर भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाचा अभ्यास करायला येतात. त्यामुळे दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय स्टडी आणि रिसर्च सेंटर स्थापन करण्यात यावे तसेच ग्रंथसंपदेसाठी अत्याधुनिक लायब्ररी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे राज्य सरकारने नागपूरच्या क्षेत्रातील दीक्षाभूमीसह ड्रॅगन पॅलेस कामठी, चिचोली, फेटरी आदी पर्यटन स्थळांना मिळून बुद्धिस्ट सर्किट स्थापण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबतही पुरेसे प्रयत्न होताना दिसत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येणार असल्याने त्यांनी या प्रस्तावांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी अॅड. कुंभारे यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला बरिएमच्या नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बरिएमचा स्थापना दिवस ११ ला
येत्या ११ एप्रिल रोजी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा अकरावा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवास शुभारंभ करण्यात येणार असल्याचे अॅड. सुलेखा कुंभारे यांनी यावेळी सांगितले. यानिमित्त महापौर नंदाताई जिचकार, नवनियुक्त नगरसेविका वंदना भगत तसेच बरिएमच्या कामठीतील नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते तसेच बहुजन समाजातील विविध संघटनांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.