सरकारने टाळेबंदीत ई-कॉमर्स सेवासुद्धा बंद कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:24+5:302021-04-13T04:07:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांच्या हितासाठी टाळेबंदीच्या काळात व्यापारासोबतच ...

सरकारने टाळेबंदीत ई-कॉमर्स सेवासुद्धा बंद कराव्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यापाऱ्यांच्या हितासाठी टाळेबंदीच्या काळात व्यापारासोबतच ई-कॉमर्स सेवासुद्धा पूर्णत: बंद ठेवण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने वेगाने वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाची चेन तोडण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देऊन टाळेबंदीची घोषणा केली आहे, त्या पार्श्वभूमीवर मेहाडिया यांची ही मागणी आहे.
शासनाने टाळेबंदीचे सर्व निर्बंध व्यापाऱ्यांवरच लादले आहेत. जेव्हा की ई-कॉमर्सद्वारे सर्व प्रकारच्या ऑनलाईन डिलिव्हरी व्यवस्था सुरळीत सुरू आहेत. या अंतर्गत अत्यावश्यक व खाद्य वस्तूंसोबतच अन्य वस्तूंची होम डिलिव्हरी केली जात आहे. हा व्यापारी वर्गावर अन्याय आहे. होम डिलिव्हरी देताना कोरोना संक्रमण सहजतेने घरादारात पोहोचत असल्याचे मेहाडिया यांचे म्हणणे आहे. लहान व मध्यम व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. परंतु, टाळेबंदीत त्यांच्या प्रति सरकार उदासीन दिसत आहे. शासनाच्या या धोरणामुळे व्यापार विस्कळीत झाल्याने अर्थव्यवस्था ढासळली आहे. आर्थिक व मानसिक तणावात असलेल्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने कोणतेच विशेष आर्थिक पॅकेज सादर केलेले नसल्याची वेदना मेहाडिया यांनी व्यक्त केली. चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनीही टाळेबंदीत सर्वाधिक नुकसान लहान व मध्यम व्यापाऱ्यांचेच होत असल्याची भावना व्यक्त केली. तरीदेखील सामाजिक व नैतिक जबाबदारी म्हणून कोरोना संक्रमणाची चेन तोडण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, सरकारने ई-कॉमर्स सेवांवरही निर्बंध लावण्याची मागणी तोतला यांनी केली आहे.
................