शासकीय रोपवाटिकेचा होतोय मेकओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST2021-08-14T04:12:25+5:302021-08-14T04:12:25+5:30

विजय नागपुरे कळमेश्वर : अलीकडे फळांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातीवंत रोपांची शास्त्रीयदृष्ट्या ...

The government nursery is undergoing a makeover | शासकीय रोपवाटिकेचा होतोय मेकओव्हर

शासकीय रोपवाटिकेचा होतोय मेकओव्हर

विजय नागपुरे

कळमेश्वर : अलीकडे फळांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातीवंत रोपांची शास्त्रीयदृष्ट्या निपज होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे, रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे. याच उद्देशातून गोंडखैरी येथील शासकीय रोपवाटिकेचा मेकओव्हर करण्यात येत आहे. येथे शेतकऱ्यांना संत्रा, मोसंबी, पेरुची दर्जेदार कलमे मिळणार असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक महेश राऊत यांनी दिली.

तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आंतरदेशीय बाजारपेठांचे जाळे अधिक बळकट होत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना यांसारख्या योजना राबविल्या जात आहेत. कोरडवाहू फळपिके, क्षारयुक्त जमिनीत लागवड, डोंगर उतारावर लागवड यामध्ये वाढ होत आहे. यामुळे रोपवाटिकांची गरज वाढत आहे. आज मागणी आणि पुरवठा यात बरेच अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी गोंडखैरीची रोपवाटिका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. १६.२७ हेक्टर परिसरात असलेल्या तालुका बीज गुणन प्रक्षेत्र तथा कृषी चिकित्सालय, गोंडखैरी येथे ८.७९ परिसरात रोपवाटिका आहे, तर मातृवृक्ष लागवडीचे क्षेत्र ७.१९ हेक्‍टर आहे. येथे तालुक्यातील तसेच इतरही शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे मिळावीत, याकरिता चार शेडनेटची निर्मिती करण्यात आली आहे. या शेडनेटमध्ये ५० हजार रोपे तयार करण्याची क्षमता आहे. सध्या येथे संत्रा, मोसंबी व पेरू या फळझाडांच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. येथील विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ९६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. रोपवाटिका परिसरात ७९० संत्रा, १०७५ मोसंबी, ४१२ पेरू, ३४० रंगपूर, ११९३ जंभेरी, तर १०० आंब्याची लागवड करण्यात आली आहे. तसेच ६ हजार पेरूची कलमे बांधण्यात आली आहेत.

ओलितासाठी पाणी पडते अपुरे

रोपवाटिकेतील तसेच इतर रोपांना जगविण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते. याकरिता येथे तीन विहिरी आहेत. परंतु यापैकी एकाच विहिरीला पाणी असून, उन्हाळ्याच्या दिवसात एक ते दीड तासच पाणी उपसा होऊ शकतो. भविष्यात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही तर येथील रोपे तसेच लावण्यात आलेली फळपिके जगविण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तसेच अचानक वीज गेल्यास एका विहिरीवर सौरऊर्जा पंप लावण्यात आला आहे, तर विहिरींची पाण्याची पातळी कायम राहावी म्हणून तीन शेततळी खोदण्यात आली आहेत.

निंबोळी पावडर

आत्मा प्रकल्पअंतर्गत १० लाख रुपये निधीतून येथे निंबोळी प्रकल्प उभारण्यात आला आहे. वर्षाकाठी येथून ३३ टन निंबोळी पावडर, २५ टन निंबोळी कर्नल पावडर व एक टन निंबोळी ढेप तयार करण्यात येते.

गांडूळ खत प्रकल्प

जमिनीचा पोत कायम राहावा, याकरिता गांडूळ खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा, याकरिता कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना गांडूळ खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता व्हावी, याकरिता येथे गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. यातून एका वर्षात सहा टन गांडूळ खत तयार करण्यात येते.

कर्मचाऱ्यांची कमतरता

सध्या या क्षेत्रात काम करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक १, कृषी सहाय्यक १, मजूर २, रखवालदार १ अशी पाच पदे मंजूर आहेत. यापैकी २ मजूर व १ रखवालदार अशी ३ पदे रिक्त आहेत. तसेच कामाचा व्याप बघता येथे २ रखवालदार व ४ रोपवाटिका मदतनिसांची पदे वाढवण्याची गरज आहे.

पाण्याचे आदर्श व्यवस्थापन

आदर्श रोपवाटिका, गोंडखैरीत लावण्यात आलेले संत्रा, मोसंबी व पेरुची झाडे तसेच शेडनेटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या हजारो कलमांना ओलिताची सोय म्हणून येथे ड्रीप ऑटोमोशेन युनिट लावण्यात आले आहे. यामुळे अपुरे पाणी असले तरी पाण्याचा अपव्यय होत नाही, तर रोपांना पाणी देण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासत नाही.

--

कृषी विभागांतर्गत कळमेश्वर तालुक्यात सुसुंद्री व तिडंगी येथे दोन शासकीय फळ रोपवाटिकांसह गोंडखैरी येथे नवीन फळरोपवाटिका तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाची फळरोपांची कलमे योग्य दरात उपलब्ध व्हावीत, असा शासनाचा प्रयत्न आहे.

योगीराज जुमडे

उपविभागीय कृषी अधिकारी

काटोल

Web Title: The government nursery is undergoing a makeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.