नानासाहेबांच्या स्मारकाचा शासनाला विसर

By Admin | Updated: May 3, 2015 02:08 IST2015-05-03T02:08:31+5:302015-05-03T02:08:31+5:30

नानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे.

The government of Nanasaheb memorial remembered the government | नानासाहेबांच्या स्मारकाचा शासनाला विसर

नानासाहेबांच्या स्मारकाचा शासनाला विसर

राजेश पाणूरकर नागपूर
नानासाहेब अर्थात प्राचार्य राम शेवाळकर. आज त्यांचा सहावा स्मृतिदिन. नानासाहेब म्हणजे चालते-बोलते ग्रंथालय, मितभाषी, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याचे. नानासाहेबांच्या नसण्याने सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात एक रितेपणा आला आहे. हे रितेपण सहजासहजी संपणारे नाही. नानासाहेबांच्या नसण्याने माणसांची एक समृद्ध मैफिल मुकी झाली. नानासाहेबांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून तत्कालीन राज्य शासनाने त्यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली. महानगरपालिकेनेही स्मारक निर्माण करण्यासाठी रस दाखविला. आज तब्बल सहा वर्षे झाली पण शासनाला आणि मनपालाही राम शेवाळकरांचाच विसर पडला आहे.
नागपुरातील कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस आणि प्राचार्य राम शेवाळकर यांच्यावर जगातील तमाम मराठीच नव्हे तर इतर भाषिक रसिकही प्रेम करतात. सुरेश भटांच्या नावाचे सभागृह किती गांभीर्याने घेतले जाते आहे, ते सांगायला नको. कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचारही केला गेला नाही. प्राचार्य राम शेवाळकरांच्या निधनानंतर मात्र त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी घोषणा झाल्या. तत्कालीन वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी प्राचार्य राम शेवाळकर स्मृती स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे देण्यात येईल, असे जाहीर केले.
महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. सहा वर्षापूर्वी नागपुरातील काही जागांची पाहणीही करण्यात आली पण त्यानंतर मात्र काहीही झाले नाही. नानासाहेबांचा विसर शासनालाही पडला आणि महानगरपालिकेलाही त्याचे काहीच वाटले नाही. आता तर हा विषय पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे.
इंग्लंड मध्ये कुणीही शेक्सपिअरचा अपमान करू शकत नाही. जगभरात कुठेही शेक्सपिअरबद्दल अवमानजनक कुणी बोलले, लिहिले तर इंग्लंडच्या संसदेत निषेध ठराव पारित केला जातो. शेक्सपिअर आमच्या नसानसांमधून वाहतो, असा स्वाभिमान इंग्लंडचे लोक ठेवतात. पण आपण आपल्याच थोर साहित्यिकांबद्दल सन्मान ठेवत नाहीत. नाशिकला कुसुमाग्रजांचा स्वाभिमान आहे. पुण्यात पु. ल. देशपांडेंच्या नावाने अकादमी आहे.
नागपुरात कविवर्य सुरेश भट, कवी ग्रेस, प्राचार्य शेवाळकर ही मोठ्या उंचीची माणसे होऊन गेलीत पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात सन्मानपूर्वक आस्था का नसावी? नागपूर महानगरपालिका सांस्कृतिक दृष्टी ठेवणारी आहे, असे बोलले जाते.
महापालिकेद्वारेही तसा दावा केला जातो. पण अवघ्या सहा वर्षात प्राचार्य राम शेवाळकरांचा मनपाला विसर का पडावा? प्रत्येक बाबींसाठी सामान्य रसिक, नागरिकांनी मनपाच्या पायऱ्या झिजवल्या तरच निगरगट्ट प्रशासन त्याची दखल घेईल, असे सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या मनपाला का वाटावे?
आता सरकार बदलले आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. प्राचार्य राम शेवाळकरांची प्रतिभा आणि उंची त्यांना व्यक्तीश: माहीत आहे. त्यांच्या नावाचे स्मारक नागपुरात व्हावे म्हणून मुख्यमंत्री पुढाकार घेणार का? यापूर्वीच्या सरकारने केलेली घोषणा ते पूर्ण करू शकतात.
प्राचार्य शेवाळकरांच्या निधनानंतर किमान त्यासाठी प्रयत्न सुरू राहिले असते तर समजून घेण्यासारखे होते. पण आभाळाएवढ्या उंचीच्या प्राचार्य राम शेवाळकरांचा आम्हाला विसर पडावा, हा सांस्कृतिक करंटेपणाच नाही का? त्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राज्य शासन आणि महानगरपालिकेने यासंदर्भात गांभीर्याने निर्णय घ्यावेत, असे मत सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The government of Nanasaheb memorial remembered the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.