नासुप्रची बरखास्ती रद्द करून सरकारने केला जनतेचा विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:48+5:302021-02-06T04:12:48+5:30
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीचा निर्णय रद्द करून राज्यातील महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष ...

नासुप्रची बरखास्ती रद्द करून सरकारने केला जनतेचा विश्वासघात
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीचा निर्णय रद्द करून राज्यातील महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी लावला आहे. भाजप या निर्णयाचा कडाडून विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन भाजप सरकारने नागपूर सुधार प्रन्यास अधिनियम बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रक्रिया मात्र पूर्ण केली नाही. राज्य मंत्रिमंडळाने बरखास्तीचा निर्णय रद्द केला. यावरून भाजपकडून विरोध सुरू झाला आहे. नासुप्रने शहराचा सत्यानाश केला. नासुप्रने विकसित केलेल्या ले-आउट्समध्ये रस्ते, नाल्या यांची दुरवस्था झाली होती. अनेक वर्ष तर पाणीदेखील पोहोचले नव्हते. अयोग्य पद्धतीने ‘आरएल’ काढण्यात आले होते. सरकारी जागा लाटण्यात आल्या होत्या. हे सगळे प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय बदलण्यात आला. भाजप सरकारच्या काळात वेगाने होणारा नागपूरचा विकास बघवला जात नसल्याने असा निर्णय घेतला असावा, अशी शंका आहे. शहरातील जनता हा निर्णय कधीच मान्य करणार नाही, असे प्रतिपादन दटके यांनी केले.