Government Ayurved College: Waiting for herbal garden for three years | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : तीन वर्षांपासून वनौषधी उद्यानाची प्रतीक्षा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : तीन वर्षांपासून वनौषधी उद्यानाची प्रतीक्षा

ठळक मुद्देचार एकर जागेची केली होती मागणी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाने या उद्यानाचा प्रस्ताव केंद्राकडे पठाविला होता, याला मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाला होता. परंतु पाण्याचा तुटवडा, प्रस्तावित बांधकाम यामुळे हा निधी परत पाठवून शासनाला कॉलेजबाहेरील चार एकर जागा उद्यानासाठी मागितली होती. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात यावर्षीपासून पदवीचे (यूजी) १२५, तर पदव्युत्तरचे (पीजी) ८४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरवर्षी एवढ्याच जागेवर विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, यासाठी ‘सीसीआयएम’च्या मानकानुसार महाविद्यालयात वनौषधी उद्यान असणे गरजेचे आहे. कारण, या उद्यानातून विद्यार्थी स्वत: वनौषधी तयार करण्यास शिकतात. म्हणून आयुर्वेद प्रशासनाने वनौषधी उद्यान (मेडिशनल प्लान्ट गार्डन) निर्मितीसाठी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. यात पहिल्या टप्प्यातील पाच लाख रुपये केंद्राने उपलब्ध करून दिले होते. महाविद्यालयाचा एकूण परिसर १५ एकराचा आहे. यातील अडीच एकरात वनौषधी उद्यानाची निर्मिती केली जाणार होती. उद्यान निर्मितीसंदर्भात दिल्लीच्या समितीने जागेची पाहणी केली होती. याशिवाय उद्यानासंदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या होत्या. परंतु या प्रस्तावाच्या मंजुरीला लागलेला उशीर तोपर्यंत मुलामुलींच्या प्रस्तावित वसतिगृहाला मिळालेली मंजुरी व पाण्याच्या समस्येमुळे महाविद्यालय प्रशासनाने मिळालेला निधी परत केला. महाविद्यालयाच्या बाहेर चार एकर जागा उद्यानासाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला. परंतु याला तीन वर्षांचा कालावधी होऊन अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय प्रशासन अडचणीत आले आहे. ‘सीसीआयएम’ याची त्रुटी काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 उद्यानाच्या जागेसाठी प्रस्ताव
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात वनौषधी उद्यानासाठी जागा अपुरी पडत आहे. यामुळे २०१५-१६ मध्ये महाविद्यालयाबाहेरची चार एकर जागा उद्यानासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. उद्यान निर्माण झाल्यास याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन ‘सीसीआयएम’ त्रुटीही काढणार नाही.
डॉ. गणेश मुक्कावार
अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

Web Title: Government Ayurved College: Waiting for herbal garden for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.