गोरेवाडा प्रकल्पाला दोन कोटींचे ‘बुस्ट’
By Admin | Updated: September 3, 2014 01:19 IST2014-09-03T01:19:18+5:302014-09-03T01:19:18+5:30
उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

गोरेवाडा प्रकल्पाला दोन कोटींचे ‘बुस्ट’
रखडलेल्या कामाला वेग येणार : एफडीसीएमच्या खात्यात निधी जमा
नागपूर : उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
विशेष म्हणजे, निधीअभावी गत काही दिवसांपासून येथील बांधकाम थंडबस्त्यात पडले होते. परंतु हा निधी मिळाल्याने त्या कामाला पुन्हा गती मिळणार आहे. वन विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी २ कोटी ९ लाखांचा निधी एफडीसीएमच्या खात्यात जमा केला आहे. माहिती सूत्रानुसार एफडीसीएमने येथील रेस्क्यू सेंटरच्या बांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथील एका खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने येथील बांधकाम करीत आहे. परंतु या सेंटरच्या बांधकामासाठी आलेला निधी अचानक संपल्याने, गत काही दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने काम बंद केले होते.
गोरेवाडा प्रकल्प हा नागपूरच्या विकासातील मैलाचा दगड मानल्या जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. गत दोन वर्षांपूर्वी स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील नैसर्गिक पायवाट व रेस्क्यू सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या अश्वासनाची पूर्तता करीत, आजपर्यंत वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळेच येथील सुरक्षा भिंत व निसर्ग पायवाटीचे काम झपाट्याने पूर्ण होऊन, रेस्क्यू सेंटरच्या बांधकामालाही वेग आला आहे. (प्रतिनिधी)