भाई नाही म्हटले म्हणून गुंडाचा मित्रावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:43+5:302021-04-05T04:07:43+5:30

कपिलनगरातील घटना : आरोपी गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मित्राने एकेरी नावाने हाक दिली म्हणून चिडलेल्या एका गुंडाने ...

The goon stabbed the friend as the brother said no | भाई नाही म्हटले म्हणून गुंडाचा मित्रावर चाकूहल्ला

भाई नाही म्हटले म्हणून गुंडाचा मित्रावर चाकूहल्ला

कपिलनगरातील घटना : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मित्राने एकेरी नावाने हाक दिली म्हणून चिडलेल्या एका गुंडाने त्याच्या दोन साथीदारांसह गोपाल विजय देशकरी (वय २५) नामक तरुणावर चाकूहल्ला केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली.

कुणाल ऊर्फ रायडर कृष्णा खडसे (वय २२) असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत दोन अल्पवयीन आरोपींचाही या गुन्ह्यात सहभाग आहे.

आरोपी कुणाल हा अंगुलीमाल नगरात राहतो तर जखमी गोपाल सहयोग नगरात राहतो. या दोघांमध्ये मैत्री होती. आरोपी कुणाल स्वतःला त्या भागातील गुंड म्हणून घेतो. तो नेहमीच घातक शस्त्र जवळ घेऊन फिरतो आणि याला त्याला धमकावतो. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास पाटणकर चौकातील एका पान शाॅपीजवळ गोपाल त्याच्या धिरज पंचारिया नामक मित्रासोबत बसला होता. त्याला आरोपी कुणाल त्याच्या दोन मित्रांसह जाताना दिसला. त्यामुळे गोपालने ''कुणाल...'' म्हणून त्याला हाक दिली. आरोपी कुणालला ते आवडले नाही. तू मला कुणालभाई का नाही म्हटले, असा प्रश्न करून त्याने गोपाल सोबत वाद घातला आणि त्याच्यावर चाकू हल्ला केला. गळ्यावर केलेला वार गोपालने चुकवला. त्यामुळे चाकू त्याच्या डोळ्याजवळ लागला. गोपाल जबर जखमी झाला. यानंतर आरोपी कुणाल आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी गोपालला मारहाण केली. मित्र आणि आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे गोपाल बचावला. या घटनेची तक्रार गोपालने कपिलनगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कुणालला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: The goon stabbed the friend as the brother said no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.