नागपूर मेट्रोसाठी खुशखबर,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:02+5:302021-02-05T04:50:02+5:30

- अर्थसंकल्पात ५,९७६ कोटींची तरतूद : दुसऱ्या टप्प्यात ४४ किमीचा विस्तार ; ३२ स्टेशन, प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार ...

Good news for Nagpur Metro, | नागपूर मेट्रोसाठी खुशखबर,

नागपूर मेट्रोसाठी खुशखबर,

- अर्थसंकल्पात ५,९७६ कोटींची तरतूद : दुसऱ्या टप्प्यात ४४ किमीचा विस्तार; ३२ स्टेशन, प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार

मोरेश्वर मानापुुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ४४ किमीच्या विस्तारासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५,९७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही नागपूरकरांसाठी खुशखबर असून, त्यामुळे मेट्रोने प्रवास सुखद होणार आहे. दुसरा टप्प्याचा डीपीआर ६,७०० कोटींचा आहे, हे विशेष.

पहिल्या टप्प्यात नागपूर मेट्रोचे ३८ किमीचे काम डिसेंबर-२०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राने निधीची तरतूद केल्याने हे काम एक महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. डीपीआर नवी दिल्लीत नागरी विकास मंत्रालयाकडे आहे. त्याला १५ दिवसांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आजपासूनच कामाचे नियोजन सुरू केले आहे. मेट्रोचा ३८ किमीचा (३८ स्टेशन) पहिला टप्पा मिहान, प्रजापतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि कळमना चौकापर्यंत आहे. आता ४४ किमीच्या (३२ स्टेशन) दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरी इंडस्ट्रीज एरिया आणि हिंगणा, कन्हान आणि ट्रान्सपोर्टनगरपर्यंत राहणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पाच वर्षांत पूर्ण होणार आहे.

नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा ८७८० कोटींचा आहे. बांधकाम करताना कोट्यवधी रुपयांची महामेट्रोने बचत केली आहे. दुसरा टप्पा ६,७०० कोटींचा आहे; पण केंद्राने ५,९७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात बचत केलेला निधी दुसऱ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणार आहे. जागेच्या अधिग्रहणाचा प्रश्न मेट्रोसमोर नाही. त्यामुळे दुसरा टप्पा पाच वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर प्रवासी संख्या वाढणार असल्याचेही अधिकारी म्हणाले.

Web Title: Good news for Nagpur Metro,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.