शुभमंगल सावधान! तेही नियम पाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:02+5:302021-04-06T04:09:02+5:30
भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे ...

शुभमंगल सावधान! तेही नियम पाळून
भिवापूर : कोरोनाच्या संक्रमणाने थैमान घातले आहे. प्रशासनाने गर्दी, मास्क, सॅनिटायझरच्या अमलबंजावणीला प्रथम स्थान दिले आहे. त्यामुळे महानगरातील लग्नसोहळे रद्द झाले. मात्र, लग्नकार्य थांबविणे योग्य नसल्यामुळे अनेक पालकांनी ‘शॉर्टकट’ पद्धतीने मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करण्याचा फार्म्यूला वापरला आहे. गत वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे अनेकांचे लग्न थांबले. मुली बघण्याचे आणि दाखविण्याचे कार्यक्रमही थांबले. त्यामुळे मुला-मुलींचे पालक चिंतीत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे मुली बघण्याचा कार्यक्रम लगबगीने सुरू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भाकीत लक्षात घेत अनेकांनी लागल्या हाताने साखरपुढा उरकला. महिनाभराच्या आतच लग्न समारंभाचा बिगुल वाजविला. मात्र, तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे वधू-वर मंडळींनी लग्नासाठी केलेले मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द करावे लागले. नागपूर शहरात कोरोनाची स्थिती भायवह आहे. अशात एकत्रित येणे, गर्दी करणे आणि लग्न लावणे धोक्याची बाब आहे. त्यामुळे अनेकांनी वधू मुलीला वर मंडळीच्या मुक्कामी गावात बोलावून पाच पन्नास आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्न कार्य उरकण्याचा कार्यक्रम चालविला आहे. संसर्गजन्य परिस्थितीत तालुक्यात अनेक गावखेड्यात व शहरात लग्न कार्य पार पडले. मात्र, पाहूण्यांची संख्या कुठे पन्नाशी, तर कुठे शंभरीपार गेलेली नाही. कारण शहर स्तरावर नगरपंचायत व ग्रामपातळीवर ग्रामपंचायतची यंत्रणा गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करण्यास सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातून कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे अनेकजण शहरातील नातेवाइकांना निमंत्रण देण्याचे टाळत असल्याचे दिसते. गर्दी दिसल्यास, तोंडावर मास्क नसल्यास थेट दंडात्मक कारवाई करा, असा पवित्रा तालुकास्तरीय यंत्रणेने घेतलेला आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांच्या नेतृत्वातील टीम तालुका स्तरावर संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रयत्नरथ आहे.
लग्नाची अखर्चित रक्कम भविष्यासाठी भेट
लग्नकार्यात लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परिस्थिती नसतानासुद्धा पालकवर्ग उधारवाढ आणि कर्ज काढून मुलीचा विवाह करतात. मुलाकडील मंडळीसुद्धा स्वागत समारोहासाठी लाखो रुपये खर्ची घालतात. मात्र, कोरोनामुळे लग्नात होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे होणाऱ्या लाखोंच्या खर्चालासुद्धा लगाम बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी लग्नकार्यातील अखर्चित रक्कम विवाहित मुलीच्या व जावयाच्या भविष्यासाठी एफडी किंवा लाईफ इन्शुरन्सच्या रूपाने भेट दिली आहे.