गोंडवाना एक्स्प्रेसने तिघांना चिरडले
By Admin | Updated: December 14, 2015 03:03 IST2015-12-14T03:03:53+5:302015-12-14T03:03:53+5:30
रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या तिघांना गोंडवाना एक्स्प्रेसने चिरडले. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी आहे.

गोंडवाना एक्स्प्रेसने तिघांना चिरडले
दोघांचा जागीच अंत : एक गंभीर जखमी
नागपूर : रेल्वेलाईनवरून जाणाऱ्या तिघांना गोंडवाना एक्स्प्रेसने चिरडले. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी आहे. रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लकडगंजमधील रेल्वेलाईनवर हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.नारायणसिंग ऊर्फ पांडूसिंग राठोड (३५, रा. झेंडाचौक, प्रेमनगर) हा एक अनोळखी व्यक्ती अशी मृतांची नावे आहेत. तर, कमलेश झुंबक जांभूळकर (वय ३०, रा. ताडसा) असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही रोजच्या कामावर जाण्यासाठी रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घराबाहेर पडले. प्रेमनगरातील (लकडगंज) रेल्वेलाईनने जात असताना मागून वेगात आलेल्या गोंडवाना एक्स्प्रेसने या तिघांना चिरडले.
भीषण अपघाताचा धक्का
नागपूर : राठोड आणि अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. काळ बनून सुसाट वेगाने आलेल्या रेल्वेगाडीची ऐनवेळी कल्पना आल्यामुळे कमलेशने बाजूला उडी मारली. मात्र, तोपर्यंत रेल्वेने त्याच्यावर झडप घातली होती. त्यामुळे रेल्वेगाडीची जोरदार धडक बसून कमलेश बाजूला फेकला गेला. तो गंभीर जखमी झाला. दिवसाढवळ्या वस्तीच्या बाजूला अनेकांसमोर हा भीषण अपघात घडल्यामुळे अनेकजण शहारले. त्यांनी आरडाओरड करीत वस्तीतील मंडळी जमा केली. लकडगंज पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांचा ताफा अपघातस्थळी पोहचला. त्यांनी तिघांनाही मेयोत नेले. डॉक्टरांनी राठोड आणि अन्य एकाला मृत घोषित केले तर, गंभीर जखमी असलेल्या कमलेशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणातील दुसऱ्या मृताचे नाव स्पष्ट झाले नव्हते. त्याचप्रमाणे लकडगंज पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नव्हता. (प्रतिनिधी)