‘पदवीधर’च्या मतदारयादीत ‘गोलमाल’; तांत्रिक त्रुुटी की प्रशासनाचा दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 07:00 IST2020-11-21T07:00:00+5:302020-11-21T07:00:07+5:30

Nagpur News Election विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदारयादीतच प्रचंड गोंधळ असल्याची बाब समोर आली आहे.

‘Golmaal’ in the voter list of ‘graduates’; Technical error or administration error | ‘पदवीधर’च्या मतदारयादीत ‘गोलमाल’; तांत्रिक त्रुुटी की प्रशासनाचा दोष

‘पदवीधर’च्या मतदारयादीत ‘गोलमाल’; तांत्रिक त्रुुटी की प्रशासनाचा दोष

ठळक मुद्देअनेक मतदारांच्या नावांची दोनदा नोंद 

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदारयादीतच प्रचंड गोंधळ असल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण मतदारसंघात अनेक मतदारांच्या नावाची दोन ते तीन वेळा नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या भाग क्रमांकामध्ये ही नोंद आहे. त्यामुळे मतदारयादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय प्रशासनाने जाहीर केलेली नावांची आकडेवारीवर शंका उपस्थित होत आहे.

न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने बनविण्यात आल्या आहेत. ‘लोकमत’ने मतदारसंघात येणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील मतदारयादीची पाहणी केली असता वरील धक्कादायक बाब निदर्शनास आली. जिल्ह्यातील संपूर्ण यादी १३९ भागांमध्ये विभाजित करण्यात आली आहे. यात शहरी व ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या याद्यांमध्ये काही ठिकाणी नावेच दिसत नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहरातील अनेक मतदारांची नावे दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या भाग व अनुक्रमांकासह नमूद करण्यात आली आहे. एकाच मतदाराची दोन वेळा नोंद होण्याचा प्रकार निश्चितच पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. केवळ वैयक्तिक मतदारच नव्हे तर काही कुटुंबीयांच्या बाबतीतदेखील असाच प्रकार झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनादेखील या प्रकाराची कुठलीही माहिती नव्हती. याबाबत माहिती घेऊन मगच भाष्य करता येईल, असे त्यांनी सांगितले.

नाव, पत्त्यात किंचित बदल

‘रिपीट’ झालेली बहुतांश मतदारांच्या वैयक्तिक माहिती दोन्ही ठिकाणी किंचित बदल दिसून येतो. एका ठिकाणी केवळ नाव असेल तर दुसऱ्या ठिकाणी वडील किंवा पतीचे नाव जोडले आहे. तर पत्ता देत असताना एका ठिकाणी संक्षिप्त पत्ता असून दुसऱ्या ठिकाणी त्यात आणखी काहीतरी ‘लँडमार्क’ नमूद केलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीतदेखील असाच प्रकार दिसून येतो. एका ठिकाणी मतदाराची एकच पदवी लिहिण्यात आली आहे, तर त्याच मतदाराची दुसऱ्या भागात नोंद करत असताना सर्व पदवीची माहिती देण्यात आली आहे.

माजी महापौरांनादेखील फटका

या गोंधळाचा माजी महापौर नंदा जिचकार यांनादेखील फटका बसला आहे. नंदा जिचकार यांचे नाव मतदारयादीतील भाग क्रमांक ५२ व १०२ मध्ये आहे. ५२ मध्ये जिचकार यांच्या व्यवसायासमोर नोकरी असे लिहिण्यात आले आहे तर १०२ मध्ये ती जागा रिकामी सोडण्यात आली आहे.

Web Title: ‘Golmaal’ in the voter list of ‘graduates’; Technical error or administration error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.