‘सीआरपीएफ’ मध्ये गोलमाल

By Admin | Updated: October 27, 2016 02:10 IST2016-10-27T02:10:32+5:302016-10-27T02:10:32+5:30

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये पदभर्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बाब उघडकीस आली आहे.

Golmaal in 'CRPF' | ‘सीआरपीएफ’ मध्ये गोलमाल

‘सीआरपीएफ’ मध्ये गोलमाल

पदभर्तीचा पेपर फुटला
व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविली प्रश्नपत्रिका
पर्यवेक्षक हवालदारास अटक


नागपूर : केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये पदभर्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बाब उघडकीस आली आहे. ही घटना हिंगणा येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूल सेंटरमध्ये घडली. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. यानंतर सीआरपीएफने आरोपी हवालदार नसीम खान याला अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

२३ आॅक्टोबर रोजी सीआरपीएफ तर्फे हवालदार पदासाठी देशभरात भर्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नागपुरातील तीन सेंटरमध्ये सुद्धा ही परीक्षा होती. यापैकी हिंगणा येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूल हे एक परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रात ६३ उमेदवारांना परीक्षेसाठी बसवण्यात आले होते. खोली क्रमांक १५ मध्ये नसीम खान हा पर्यवेक्षक होता. सकाळी ९.३० वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येणार होते. नसीम खानकडे सकाळी ९.०२ वाजता एका बंद पॉकेटमध्ये प्रश्नपत्रिका सोपवण्यात आल्या. त्याने प्रश्नपत्रिका मिळताच. सीलबंद पॅकेट उघडले. प्रश्नपत्रिकेचा मोबाईलने फोटो काढला आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लोकांना पाठविला. हा सर्व प्रकार केंद्रातील उमेदवार पाहत होते. त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी परीक्षा केंद्रातील सुपरवायजर विक्रांत सारंगपणी आणि सहायक कमांडंट सुबोध कुमार सिंह यांना ही बाब सांगितली. दोन्ही अधिकारी लगेच नसीम खानकडे गेले. त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईलची तपासणी केली असता त्याने दोन लोकांना प्रश्नपत्रिका पाठवल्याचे आढळून आले. सहायक कमांडंट सुबोध कुमार सिंह यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एपीआय प्रभाकर शिऊरकर यांनी भादंवि कलम ४६२ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नसीमला अटक केली. या घटनेमुळे सीआरपीएफ अधिकारी हादरले आहेत. (प्रतिनिधी)

देशभरात नेटवर्क
सूत्रानुसार नसीमने प्रश्नपत्र ‘लीक’ करीत मोबाईलद्वारे ते दिल्लीला पाठविले होते. तेथून उत्तर प्रदेशातील रामपूरसह देशभरातील शहरांमध्ये पाठवण्यात आले. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला, अन्यथा याबाबत कुणालाच काही कळले नसते. या प्रकरणामुळे दिल्ली व रामपूरमध्ये वादळ उठले आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी इतर ठिकाणीसुद्धा याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Web Title: Golmaal in 'CRPF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.