सिनेगीतांचा सुनहरी यादे....
By Admin | Updated: June 23, 2014 01:23 IST2014-06-23T01:23:53+5:302014-06-23T01:23:53+5:30
काही गीतांचे भावपूर्ण शब्द मनाच्या सांदीकोपऱ्यात कायम विसावलेले असतात. रुपेरी पडद्यावरील अशा गीतांच्या प्रसंगाच्या काही खास आठवणींशी श्रोत्यांचेही भावबंध अतूट जुळलेले असतात.

सिनेगीतांचा सुनहरी यादे....
रोटरी क्लब : स्पंदनचे आयोजन
नागपूर : काही गीतांचे भावपूर्ण शब्द मनाच्या सांदीकोपऱ्यात कायम विसावलेले असतात. रुपेरी पडद्यावरील अशा गीतांच्या प्रसंगाच्या काही खास आठवणींशी श्रोत्यांचेही भावबंध अतूट जुळलेले असतात. अशाच खास हिंदी सिनेगीतांच्या ‘सुनहरी यादे...’ या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृहात आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब व स्पंदनतर्फे क रण्यात आले. कार्यक्रमात लोकप्रिय गीतांनी रसिकांचा ताबा घेतला.
विनय शुक्ला, मयंक लखोटिया, यशश्री भावे - पाठक, सोनाली दीक्षित या नव्या जुन्या गायकांचा सहभाग असलेल्या या सादरीकरणात मधूर अनुभूतीच्या सिनेगीतांचा समावेश होता. विनय व यशश्रीने ‘दिल पुकारे आरे आरे..’ या गीताने प्रारंभ केला. प्रतिभावंत शायर, संगीतकारांच्या अपूर्व योजकतेतून दिग्गज गायकांच्या स्वरातून साकार झालेली ही गाते आजही लोकप्रिय आहेत. याप्रसंगी सर्वच गायकांनी तयारीने सादरीकरण करुन रसिकांची दाद घेतली. मयंक लखोटियाने ‘तुमने मुझे देखा.., ये दुनिया उसी की.., अभी ना जाओ छोडकर...’ आदी गीतांनी खास समां बांधला. यशश्रीने ‘रंगीला रे...’ विनयसह सादर केलेले ‘चुडी नही मेरा दिल है...’मयंकसह सादर केलेले ‘अभी ना जाओ छोडकर...’ या गीतांना रसिकांनी खास दाद दिली. सोनालीने ‘पिया तोसे नैना लागे रे..’ हे गीत भावपूर्णतेने सादर केले. यावेळी ‘फुलो के रंगसे..., अच्छा जी मै हारी पिया...दिवाना हुआ बादल..., खोया खोया चाँद...’ आदी गीते सादर करण्यात आली.
यात प्रामुख्याने देवानंद व शम्मी कपूर यांच्यावर चित्रित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन पवन मानवटकर यांनी केले. गायकांना अशोक टोकलवार, रुनंदन परसटवार, सुभाष वानखेडे, तुषार विघ्ने, पवन मानवटकर, रिंकु निखारे, प्रकाश चव्हाण यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली.
नासिर खान यांचे निवेदन होते. स्पदंन संस्थेच्या दुर्बलमनस्क मुलांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे संचालक पांडुरंग सोनवणे, प्रतिकृतीचे विनय शुक्ला, मिलिंद तोतरे, तिवारी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी)