शेणखताला आले सोनेरी दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:12+5:302021-04-30T04:10:12+5:30
मधुसूदन चरपे गुमगाव : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत घसरत चाललेली आहे. परिणामी, सेंद्रिय व जैविक शेती ...

शेणखताला आले सोनेरी दिवस!
मधुसूदन चरपे
गुमगाव : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत घसरत चाललेली आहे. परिणामी, सेंद्रिय व जैविक शेती करण्यावर काही शेतकरी आता भर देत आहेत. जमिनीची पोत सुधारावी याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे आता वळले आहेत. मात्र हल्ली पशुधनाच्या कमतरतेमुळे पूर्वी सहज मिळणारे शेणखत आता भाव खाऊ लागले आहे. परिणामी, शेणखताला चांगला भाव मिळतो आहे. सध्या गुमगाव परिसरातील कोतेवाडा, वागदरा, खडका, किरमिटी, शिवमडका, लाडगाव, वडगाव, जामठा, सोंडापार, धानोली, कान्होली, डोंगरगाव, खापरी आदी गावामधील कसदार शेती काहीअंशी मिहान, समृद्धी महामार्ग, निवासी वसाहत, विविध कंपन्या आणि गोडाऊन्ससाठी आता उपयोगात आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरे-पशुधन कमी झाले. त्यामुळे शेणखताचा तुटवडा आता परिसरात प्रकर्षाने जाणवू लागला आहे. रासायनिक खते हे आरोग्याला हानीकारक ठरत असल्याचे जाणकाराचे मत आहे. कर्करोग, हृदयरोग, अकाली केस पांढरे होणे आदी रोगांच्या प्रमाणात वाढ होत आहे. शरीराला पोषक अन्नद्रव्य मिळत नाही. सततच्या रासायनिक खतवापराने जमीन नापिकी होते. जमिनीची पाणी टिकविण्याची क्षमता नष्ट होत आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असल्याने रासायनिक खते परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. परिणामी, शेतकरी पुन्हा एकदा शेणखताकडे वळत आहेत. चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला सध्या अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
--
माझ्या शेतात सेंद्रिय भाजीपाला लागवड केली असून वांगी, टोमॅटो, भेंडी, पालक, चवळी, कांदा, लसूण, सांबार इत्यादीचे शेणखताच्या वापराने भरघोस उत्पन्न घेत आहो. रासायनिक खताच्या तुलनेत शेणखताच्या वापराने अधिक मोबदला मिळतो आहे.
विष्णू डहाके, शेतकरी.