एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच सोन्याची तस्करी
By Admin | Updated: September 13, 2014 02:38 IST2014-09-13T02:38:27+5:302014-09-13T02:38:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी होत असल्याचे एक प्रकरण केंद्रीय उत्पादन...

एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच सोन्याची तस्करी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी होत असल्याचे एक प्रकरण केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने उजेडात आणले आहे.
४ जुलै २०१४ रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने निवृत्त सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बोबडे यांना ३१ लाख ९९ हजार रुपये किमतीच्या सोन्याची वीट आणि बिस्किटासह अटक केली होती. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (अ) (ड)अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. जप्त मालाच्या मालकीचा दावा करणारा कोणीही पुढे न आल्याने न्यायालयाने बोबडे यांना तडकाफडकी दोषमुक्त केले होते. पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने केला. त्यांनी ९ सप्टेंबर २०१४ रोजी सीमा शुल्क कायदा १९६२ च्या कलम १०४ अंतर्गत तीन जणांना अटक केली. सोन्याची तस्करी करणे, तस्करीची सुविधा उपलब्ध करून देणे, मदत करणे आणि चालना देणे, असे आरोप या आरोपींविरुद्ध आहेत.
आरोपींपैकी एकाने ४ जुलै रोजी एअर अरेबिया विमानाने शारजहा ते नागपूर, अशी सोन्याची तस्करी केली होती. एअरलाईन्समध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही खेप नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर करण्यात आली होती. त्यानंतर ती वाहनतळात आपल्या कारमध्ये प्रतीक्षा करीत असलेले बोबडे यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. त्याच वेळी पाळत ठेवून असलेल्या गुन्हे शाखा पथकाने झडप घेऊन बोबडे यांना मालासह अटक केली होती.
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क आयुक्तालयाच्या प्रतिबंधक युनिटने तपास केला असता या सोन्याच्या या तस्करीसाठी सुविधा पुरवण्यात, मदत करण्यात आणि चालना देण्यात एअरलाईन्सचे दोन कर्मचारी आणि कार्गो सर्व्हिस एजंट सामील असल्याचे आढळून येताच त्यांना या प्रतिबंधक युनिटने अटक केली आणि जामिनावर सोडून दिले.
दरम्यान गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सोन्याच्या तस्करीच्या एका म्होरक्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ६ मध्ये शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. (प्रतिनिधी)