सोन्याची तस्करी
By Admin | Updated: July 5, 2014 02:08 IST2014-07-05T02:08:47+5:302014-07-05T02:08:47+5:30
विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेशाखेच्या पथकाने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ३५ लाखांचे सोने जप्त केले.

सोन्याची तस्करी
नागपूर : विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेशाखेच्या पथकाने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ३५ लाखांचे सोने जप्त केले. प्रदीप वासुदेवराव बोबडे (वय ५९) असे पकडण्यात आलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बोबडे नागपूर शहर पोलीस दलात धंतोलीचे ठाणेदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीवायएसपी आणि लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत होते. वर्षभरापूर्वीच ते सहायक आयुक्त (एसीपी) म्हणून निवृत्त झाले.
पोलीस दलातील एक निवृत्त अधिकारी नागपूर विमानतळावरून लाखोंच्या सोन्याची खेप घेणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला कळली. त्यावरून पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेने कारवाईसाठी सापळा रचला.
विमानतळ परिसरात थेट कारवाईचे आदेश नसल्याने गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळ, सहायक निरीक्षक मंगेश देसाई आपल्या सहकाऱ्यांसह विमानतळाच्या बाहेरच्या परिसरात आज सकाळी ९ पासून दबा धरून बसले.
विमानतळावरून सिनेस्टाईल पाठलाग
नागपूर : सकाळी १० च्या सुमारास निवृत्त एसीपी बोबडे इनोव्हा कार (एमएच ३१/ डीसी ४९९०) मधून विमानतळावरून वर्धा मार्गाकडे वेगाने जाताना दिसताच गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. सोनेगाव परिसरात गुन्हेशाखेच्या पथकाने आपले वाहन उभे करून बोबडे यांची इनोव्हा रोखली. बोबडे यांनी आपण स्वत: ‘एसीपी होतो’, असे सांगून कारवाईच्या पवित्र्यातील पोलीस पथकाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी तेवढ्याच धिटाईने बोबडे यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या पॅन्टच्या खिशात सोन्याची १ विट (किंमत ३१ लाख रुपये), १०० ग्रामचे बिस्कीट (३ लाख १०), ३२ ग्रामची १६ नाणी (९९ हजार २००) असे एकूण ३५ लाख ९ हजार २०० रुपयांचे सोने आढळले. त्यांच्या कारमध्ये एक ४० हजारांचा एलसीडीसुध्दा आढळला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल तसेच पळून जाण्यासाठी वापरलेली सात लाखांची इनोव्हा कार ताब्यात घेऊन बोबडेंना गुन्हेशाखेत आणले. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना कोर्टात नेले.
दरम्यान, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ३५ लाखांच्या सोन्यासह ताब्यात घेतल्याची वार्ता उपराजधानीत सर्वत्र वायुवेगाने पसरली. सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्त के. के.पाठक यांनी गुन्हेशाखेत येऊन जप्त केलेले सोने तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल बघितला.
बोबडे यांची तत्काळ सुटका
सोने आणि इतर किमती वस्तू, अशा ४२ लाख ४९ हजाराच्या जप्त छुप्या मालाच्या प्रकरणी शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने आरोपी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त प्रदीप बोबडे यांची तडकाफडकी सुटका केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यास आरोपीची गरज भासल्यास समक्ष हजर होण्याच्या संदर्भात आरोपीला पूर्वसूचना द्यावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.
या प्रकरणाचा गवगवा होऊ नये, छायाचित्रकारांना बोबडे यांचे छायाचित्र घेता येऊ नये, यासाठी अतिशय दक्षता बाळगून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना छुप्या मार्गाने न्यायालयात आणले. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी बोबडे यांना न्यायालयात हजर केले.
बोबडे हे संशयास्पदस्थितीत किमती मालासह आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (अ) (ड)अन्वये सोनेगाव पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे या कारवाईची कोणालाही माहिती देऊ नये, असे आदेश सोनेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिले होते.
न्यायालयात बोबडे यांचे वकील अॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अॅड. पराग उके यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, संबंधित किमती मालाच्या संदर्भात चोरी अथवा लबाडीच्या गुन्ह्याची कोठेही नोंद नाही. त्यामुळे त्यांना अटकेत ठेवता येणार नाही.
न्यायालयाने सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून बोबडे यांच्या सुटकेचा आदेश दिला. (प्रतिनिधी)