नागपूर : गुरुवारी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात, विशेषतः नागपूरमध्ये, सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारच्या तुलनेत तब्बल १,७०० रुपयांनी कमी झाले, तर चांदीच्या दरात ९०० रुपयांची घट झाली.बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता, जो गुरुवारी ९९,२०० रुपयांवर आला. चांदीचा दर १,१६,७०० रुपये प्रति किलो वरून १,१५,८०० रुपयांपर्यंत खाली आला.
गुरुवारी सोन्याच्या दरात दोन टप्प्यांत घसरण झाली. सकाळच्या सत्रात १,४००, तर दुपारच्या सत्रात ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. दर घसरले असले तरी प्रचंड दरवाढीमुळे सोने-चांदीची खरेदी अद्यापही सामान्य ग्राहकांसाठी आवाक्याबाहेरच आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३ टक्के जीएसटी जोडल्यावर किंमत पुन्हा लाखाच्या पुढे जाते, त्यामुळे दागिने खरेदी करणे अनेकांसाठी स्वप्नवतच ठरत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीदार दोघेही साशंकतेच्या वातावरणात आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना अधिक पर्याय देण्यासाठी केंद्र सरकारने आता ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांनाही हॉलमार्क अनिवार्य केले आहे. यामुळे स्वस्त सोन्याचे पर्याय अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरत आहेत.