तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST2021-03-27T04:07:12+5:302021-03-27T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा देऊन एका महिलेने सराफा व्यापाऱ्याला ९८ हजार रुपयांचा गंडा घातला. ...

तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांब्याच्या साखळीवर सोन्याचा मुलामा देऊन एका महिलेने सराफा व्यापाऱ्याला ९८ हजार रुपयांचा गंडा घातला. तिचा डाव साधल्याचे बघून तिची दुसरी साथीदार अशाच प्रकारे फसवणूक करायला सराफा व्यापाऱ्याकडे आली आणि सराफा व्यापार्याने तिला गणेशपेठ पोलिसांच्या हवाली केले. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
अनुप अशोक उदापुरे या सराफा व्यापार्याने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी कॉटन मार्केटमधील त्यांच्या दुकानात बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास एक महिला आली. तिने आपले नाव खुशबू ऊर्फ ईशानी मनोज पांडे असे सांगितले. जवळची सोन्याची साखळी बदलून दुसरी नवीन घ्यायची आहे, असे तिने सराफा व्यापाऱ्याला सांगितले. उदापुरे यांनी साखळीचे वजन करून त्या बदल्यात तिला ९८ हजार, १७५ रुपये किमतीची नवीन सोनसाखळी आणि ६७५ रुपये दिले. रात्री दुकान बंद करताना त्यांनी, कथित खुशबूने दिलेल्या सोनसाखळीची तपासणी केली असता, ती सोन्याची नसून तांब्याची असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी सरिता अंगद पांडे नामक महिला उदापुरे यांच्या दुकानात आली. तिने सोन्याचा मुलामा असलेल्या बांगड्या उदापुरे यांना विकण्याचा प्रयत्न केला. यांनी त्या महिलेला कसलाही संशय येऊ न देता, गणेशपेठ पोलिसांना बोलाविले. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी आपल्या सहकार्यांसह दुकानात धाव घेऊन, सरिता पांडे नामक महिलेला ताब्यात घेतले. तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या साथीदार महिलेबाबत विचारणा करण्यात आली. तिला फसवणुकीच्या आरोपात अटक करण्यात आली. तिच्या साथीदार महिलेचा शोध घेतला जात आहे.