वन कर्मचाऱ्यांवर सुवर्ण पदकांचा वर्षाव
By Admin | Updated: August 19, 2014 00:58 IST2014-08-19T00:58:27+5:302014-08-19T00:58:27+5:30
जीवाची पर्वा न करता, वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या राज्यभरातील धाडसी व कर्तबगार वन अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात यंदा नागपूर

वन कर्मचाऱ्यांवर सुवर्ण पदकांचा वर्षाव
कर्तृत्वाचा गौरव : सोनटक्के यांना सुवर्ण, बैस यांना रजत
नागपूर : जीवाची पर्वा न करता, वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या राज्यभरातील धाडसी व कर्तबगार वन अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात यंदा नागपूर वनवृत्तातील वन कर्मचाऱ्यांवर अक्षरश: सुवर्ण पदकांचा वर्षाव झाला आहे. यामध्ये वनक्षेत्रपाल डी. एस. टेकाडे, वनपाल अभिलाषा सोनटक्के व वनरक्षक सी. एस. शाहू यांना सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. तसेच विभागीय वन अधिकारी एस. व्ही. रामराव व वनरक्षक प्रदीपसिंग बैस यांना रजत पदक मिळाले आहे.
याशिवाय गडचिरोली वनवृत्तातील विभागीय वन अधिकारी ए. श्रीलक्ष्मी, वनपाल एस. एम. गाजलवार, वनरक्षक व्ही. आर. गोल्लेवार व जी. सी. बोळा यांच्यासह चंद्रपूर येथील उपवनसंरक्षक आर. टी. धाबेकर, वनक्षेत्रपाल विवेक मोरे, वनपाल एन. एन. बोधे, बंडू लालसरे, व्ही. डी. गलगट व व्ही. एस. मोरे यांचा समावेश आहे. येत्या २१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे आयोजित एका राज्यस्तरीय समारंभात राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. राज्य शासनातर्फे प्रत्येक पाच वर्षांनंतर उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यासाठी संबंधित मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून वनरक्षक ते उपवनसंरक्षक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या शिफारशींसह त्यांच्या कामाचे स्वरूप, गोपनीय अहवाल, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा अहवाल मागविल्या जातो.
त्यानुसार २०१२-१३ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच १३ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यात राज्यभरातील एकूण ३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण पदके, १६ जणांना रजत व एका वनरक्षक कर्मचाऱ्याला मरणोत्तर विशेष पदक प्रदान करून गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
बैस यांची ‘हॅट्ट्रिक’
सेमिनरी हिल्स येथे वनरक्षकपदी कार्यरत प्रदीपसिंग बैस यांनी यंदाच्या रजत पदकासह पुरस्कारांची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या सेवाकाळात सतत दोन सुवर्ण व एक रजत पदक पटकाविले आहे. त्यांची नागपूर वन विभागात ‘आॅपरेशन स्पेशालिस्ट’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कोणतेही सिक्रेट आॅपरेशन यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानल्या जाते. या बळावर त्यांनी आतापर्यंत अनेक शिकाऱ्यांना गजाआड केले आहे. शिवाय नुकत्याच दोन वर्षांपूर्वी राज्यभरात गाजलेल्या कोब्रा नागाच्या विषासह आरोपींना रंगेहात पकडण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तसेच वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाईत ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. कदाचित शासनाने त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन, यंदा पुन्हा रजत पदक जाहीर केले आहे. शिवाय लकडगंज येथील वनपाल अभिलाषा सोनटक्के या सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राज्यभरातील पहिल्या महिला वन कर्मचारी ठरल्या आहेत.