लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेतून गोल्ड लोन घेणाऱ्या व ते दागिने खरे असल्याचे सांगून बँकेला ७३ लाख ९० हजार ९४४ रुपयांनी गंडा घालणाऱ्या एकूण १७ आरोपींविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल रामचंद्र उरकुडे (५९, रा. लालगंज राऊत चौक, मस्कासाथ) असे आरोपी ज्वेलर्सचे नाव आहे, तर त्याच्यासह इतर १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल उरकुडे हा शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेत बँकेत गहाण ठेवण्यासाठी येणारे सोन्याचे दागिने तपासून त्याची खात्री करून देण्याचे काम पाहत होता. आरोपी उरकुडे याने इतर १६ ग्राहकांसोबत संगनमत करून त्यांचे बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगितले. त्यानुसार बँकेने त्या १६ ग्राहकांना ७३ लाख ९० हजार ९४४ रुपये गोल्ड लोन दिले; परंतु अनेक वर्षे उलटल्यानंतरही ग्राहकांनी गहाण ठेवलेले दागिने परत न नेल्यामुळे बँकेला संशय आला. बँकेने ते दागिने तपासले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मण विठ्ठलराव सिंगम (५७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
आठ वर्षांपूर्वी घेतले गोल्ड लोनआरोपी अनिल उरकुडे याने बनावट दागिने खरे असल्याचे सांगितल्यामुळे बँकेने १६ ग्राहकांना गोल्ड लोन दिले. हे दागिने २४ मार्च २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालवधीत गहाण ठेवण्यात आले होते. आठ वर्षांनंतर बँकेला हे दागिने बनावट असल्याचे समजले आणि हा गैरप्रकार उघडकीस आला.