शिकारीला जाणे जिवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:36+5:302021-05-24T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेल्या चाैघांपैकी एकाचा वीज प्रवाहित असलेल्या वाहिनीला स्पर्श झाल्याने जाेराचा धक्का ...

शिकारीला जाणे जिवावर बेतले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेल्या चाैघांपैकी एकाचा वीज प्रवाहित असलेल्या वाहिनीला स्पर्श झाल्याने जाेराचा धक्का लागून मृत्यू झाला. शिवाय, पाेलिसांनी उर्वरित तिघांना अटक केली. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिराेंजी शिवारात शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री घडली.
शाबुलाल भूमका येवनाती (रा. बटकुली, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे, तर नंदकुमार ढेकू, रामजी धुर्वे व सिरपत अटकूल तिघेही (रा. बटकुली, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) अशी अटकेतील आराेपी शिकाऱ्यांची नावे आहेत. सिराेंजी शिवारात माेठ्या प्रमाणात जंगल असून, त्या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मध्य प्रदेशातील काही शिकारी या भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी अधूनमधून येतात. त्यामुळे हे चाैघेही शुक्रवारी मध्यरात्री या भागात शिकार करण्याच्या उद्देशाने सिराेंजी शिवारात दाखल झाले हाेते.
सिराेंजी शिवारातील नाल्याजवळून जात असताना शाबुलालचा अनावधानाने वाहिनीला स्पर्श झाला. त्यात वीज प्रवाहित असल्याने त्याला जाेरात विजेचा धक्का लागला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तिघांनीही लगेच गावाच्या दिशेने पळ काढला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २२) ओमेश भिमटे, रा. बटकुली, जि. छिंदवाडा यास शाबुलालचा मृतदेह नाल्याच्या परिसरात आढळून आल्याने त्याने पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, संशय आल्याने त्यांनी बटकुली येथे जाऊन स्थानिक नागरिकांकडे चाैकशी केली.
चाैघेही शिकारी असून, ते शिकार करण्यासाठी या भागात आले असल्याचे कळताच त्यांनी तिघांनाही ताब्यात घेत विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे व मंगेश म्हैसणे यांच्या पथकाने केली.