ंया देवी सर्वभुतेषू शक्तिरूपेण संस्थित:

By Admin | Updated: October 14, 2015 03:25 IST2015-10-14T03:25:15+5:302015-10-14T03:25:15+5:30

समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे दुर्गादेवी. आपल्या संस्कृतीत भगवती देवीची आराधना आणि जागरणाला विशेष महत्त्व आहे.

Goddess Sarbhutheshu Shaktiwaran Institute: | ंया देवी सर्वभुतेषू शक्तिरूपेण संस्थित:

ंया देवी सर्वभुतेषू शक्तिरूपेण संस्थित:

नागपूर : समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे दुर्गादेवी. आपल्या संस्कृतीत भगवती देवीची आराधना आणि जागरणाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रौत्सवात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आराधना विशेष फलदायी असल्याची मान्यता आहे. देवी म्हणजे शक्तीचेच स्वरूप आहे. अखिल ब्रम्हांडातील विनाशक आणि आसुरी शक्तींचा नायनाट करीत शस्त्र धारण केलेली देवी या नऊ दिवसात सात्विक वातावरणाची निर्मिती करते, अशी मान्यता आहे. त्यामुळेच देवीची आराधना कडक केली जाते. नवरात्र उत्सवानिमित्त बाजारात आणि भक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण होतेच. पण या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी देवीचा जयघोष करीत घटस्थापना केली. घरोघरी घटस्थापनेसह सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळात आणि विविध प्राचीन देवी मंदिरातही घटस्थापना उत्साहात करण्यात आली.
बाजार फुलला
नवरात्र उत्सवानिमित्त शहर ढवळून निघाले. काल सोमवारीही बाजार फुलला होता आणि देवीच्या पूजनाचे सामान घेण्यासाठी बाजारात भाविकांची गर्दी झाली. मंगळवारीही दिवसभर भाविकांच्या गर्दीने बाजार फुलला होता. सक्करदरा चौक, महाल, गोकुळपेठ, वर्धमाननगर, धरमपेठ, इतवारी येथे देवीच्या पूजन सामग्रीच्या दुकानात भाविकांनी गर्दी केली. पहिल्या दिवशी प्रामुख्याने सोनचाफा किंवा शेवंतीच्या फुलांची माळ देवीला घातली जाते. त्यामुळे शेवंतीची फुले शोधण्यासाठी भाविकांनी प्रत्येक बाजारपेठेत हजेरी लावली. प्रामुख्याने धंतोली येथील फुलांच्या बाजारपेठेत अनेक भाविकांनी फुले घेण्यासाठी गर्दी केली. यंदा फुलांच्या किमतीत तिपटीने वाढ झाली असली तरी आराध्य देवतेच्या प्रसन्नतेसाठी भाविकांनी चढ्या बाजारात झेंडू आणि शेवंतींची फुले विकत घेतली.
घरोघरी घटस्थापना
नवरात्र उत्सवाच्या काळात पावसाळा संपलेला असतो आणि सर्वत्र हिरवेगार उत्साहाचे वातावरण असते. शेतातील काही पिके तयार झालेली असतात तर काही पिकांचे उत्पादन पूर्णत्वास आले असते. त्यामुळेच देवीला समृद्धीचे आणि संपत्तीचेही प्रतीक मानले जाते. शेतातील पिके या काळात हातात येतात त्यामुळे बळीराजाही आनंदात असतो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटात दीपप्रज्ज्वलन करून ब्रम्हांडातील आदिशक्ती-आदिमायेची पूजा केली जाते. घटरुपी ब्रम्हांडात चैतन्यस्वरुप तेजस्वी आणि अखंड तेवणाऱ्या ज्योतीचे पूजन आदिशक्तीचे प्रतीक म्हणून करण्याची परंपरा आहे. ही परंपपरा सांभाळताना घटस्थापना केल्यावर घरोघरी हा नंदादीप अखंड नऊ दिवस तेवत ठेवण्याचा संकल्प भाविकांनी केला. आज पहिल्याच दिवशी घटस्थापना केल्यावर त्या चैतन्यशक्तीचा आनंद भाविकांनी व्यक्त करून यथाशक्थी देवीची कडक आराधना करण्याचा संकल्प केला.
मिरवणुकांनी दुमदुमले शहर
सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्यावतीने सोमवारपासूनच सार्वजनिक देवीची मूर्ती मंडळात नेण्याला प्रारंभ करण्यात आला. सोमवारपासूनच शहरात मिरवणुकीने देवीची मूर्ती मंडळाच्या स्थळापर्यंत नेण्यात येत होती. पण काही कारणाने सोमवारी मूर्ती न नेऊ शकलेल्या सार्वजनिक मंडळांनी मंगळवारी देवीची मूर्ती वाजत-गाजत विविक्षीत स्थळी नेली. शहरातील रस्ते यावेळी मिरवणुका आणि देवीच्या विशाल मूर्तींनी गजबजले होते. आवागमन करणारे नागरिकही देवीची मूर्ती दिसल्यावर भक्तीभावाने नतमस्तक होऊन देवीला नमस्कार करीत होते. जय मातादीच्या गजराने आणि वाजंत्रीच्या निनादाने शहर दुमदुमले. गुलाल उधळीत मोठ्या उत्साहाने विविध वाहनात देवीची मूर्ती स्थानापन्न करून मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात देवीला घेऊन जात होते.
मंदिरात शेज व रोशनाई
नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जवळपास सर्व लहानमोठ्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीची मंदिरे तर विशेषत्वाने रोशनाईने सजविण्यात आली. प्रत्येक देवी मंदिरात देवीच्या मूर्तीला फुलांची विशेष शेज करण्यात आली होती. यामुळे देवीची मूर्ती अधिक आकर्षक आणि प्रसन्नतेचा अनुभव देणारी होती. यानिमित्ताने पहिल्याच दिवशी विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले. मंदिरांमध्येही दिवसभर भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पताका, तोरणे, रोशनाई आणि शेज यामुळे शहरातील सर्व भागातील मंदिरे सजली होती. त्यामुळे या उत्सवाच्या पहिल्यात दिवशी उत्सवाचे आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले. भगव्या पताका, आंब्याच्या पानांची तोरणे, झेंडूच्या फुलांचे हार आणि भजनांचा स्वर या उत्सवाच्या उत्सहात भर टाकणारा होता.
देवीला ओटी भरण्यासाठी
महिलांचा पुढाकार
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. मंगळवारी दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी त्यावर खण, नारळ ठेवून महिलांनी देवीची ओटी भरली.
आग्याराम देवी मंदिरातही भाविकांचे दर्शन
शहरातील आग्याराम मंदिरातही देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावून गर्दी केली. हे प्राचीन मंदिर आहे आणि येथील देवीला बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची मान्यता आहे. त्यामुळेच नवरात्र उत्सवात केवळ शहरातीलच नव्हे तर शहराच्या बाहेरूनही अनेक भक्तगण मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आग्याराम मंदिरातही सुरक्षेचे चोख उपाय योजण्यात आले असून भाविकांना मातेचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी अनेक भाविकांनी विविध नवस बोलून देवीला साकडे घेतले. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून या स्थानाला विशेष माहात्म्य आहे. यानिमित्ताने अनेक भाविकांनी नऊ दिवस उपवास करण्याचाही संकल्प सोडला.

Web Title: Goddess Sarbhutheshu Shaktiwaran Institute:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.