वसुलीची रक्कम जमा केल्यावरच घरी जा
By Admin | Updated: November 4, 2014 01:01 IST2014-11-04T01:01:12+5:302014-11-04T01:01:12+5:30
संपत्ती कराची जमा होणारी रक्कम कर्मचारी दररोज बँकेत जमा करीत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. कर्मचाऱ्यांची ही प्रवृत्ती थांबविण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत संपत्ती कराची

वसुलीची रक्कम जमा केल्यावरच घरी जा
मनपा प्रशासनाचे निर्देश : संपत्ती कर विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
नागपूर : संपत्ती कराची जमा होणारी रक्कम कर्मचारी दररोज बँकेत जमा करीत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. कर्मचाऱ्यांची ही प्रवृत्ती थांबविण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत संपत्ती कराची वसूल करण्यात आलेली रक्कम त्याच दिवशी बँकेत जमा करावी असे निर्देश दिले आहेत. जेव्हापर्यंत कर्मचारी वसूल केलेली रक्कम बँकेत जमा करणार नाही, तोपर्यंत त्यांना घरी जाता येणार नाही. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास निलंबनाची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. त्यामुळे या निर्देशानंतर संपत्ती कर विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेच्या काही झोन कार्यालयात संपत्ती कराची रक्कम वसूल करण्यात आली. परंतु ती रक्कम महिना उलटूनही बँकेत जमा करण्यात आली नाही. संबंधित प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे. यामुळे महापलिकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
सध्या संपत्ती कर भरण्याची प्रक्रिया कॉम्प्युटराईज आणि मॅन्युअली अशी दोन्ही पद्धतीने सुरू आहे. संपत्तीधारकांच्या सुविधेसाठी टॅबलेट आणि प्रिंटर संपत्ती कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. संपत्ती धारकांच्या घरी पोहोचून कर्मचारी थेट कर स्वीकारून त्याची पावती देतात. मॅन्युअली सुद्धा पावती देऊन रक्कम वसूल केली जात आहे. दोन्ही व्यवस्थेमुळे वसूल करण्यात आलेली रक्कम सहायक आयुक्तांमार्फत तातडीने बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एखादा कर्मचारी रक्कम त्याच दिवशी जमा करणार नाही, तर त्याला घरी न जाऊ देण्याचे निर्देश आहेत.
उपायुक्त संजय काकडे यांनी यासंबंधात सांगितले की, संपत्ती कर व्यवस्था आणखी सहज व प्रभावी बनविण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत ही व्यवस्थासुद्धा केली जात आहे. कराच्या रूपात दररोज जमा होणाऱ्या रकमेची माहिती देणे व ती बँकेत जमा करणे बंधनकारक आहे.(प्रतिनिधी)