जा मुलांनो आता संपली रे कथा..
By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:56:28+5:302014-06-08T00:56:28+5:30
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी आणि गीतकार बी. काशीनंद यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. बी. काशीनंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रवाह आपल्या गीतातून

जा मुलांनो आता संपली रे कथा..
कवी बी. काशीनंद यांचे निधन
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी आणि गीतकार बी. काशीनंद यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
बी. काशीनंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रवाह आपल्या गीतातून मांडला. दुसर्या वर्गापर्यंंत शिक्षण झालेल्या या कवीने भीम व बुद्ध गीतांच्या माध्यमातून निळी क्रांती घडवली. परिस्थितीचे चटके सहन करीत आपल्या आयुष्याची धम्म शिदोरी समाजाला वाहिली. ‘पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता संपली रे कथा’, ‘या दीडदमडीच्या पायी, माझा समाज विकणार नाही..’ अशा अनेक भीम व लोकगीतांनी बी. काशीनंद यांनी जनसामान्यांच्या मनामनांत वास केला. १९८२-९0 मध्ये बी. काशीनंद यांच्या गीतांच्या कॅसेट ‘एचएमव्ही’ या नामांकित कंपनीने ध्वनिमुद्रित करून बाजारात आणल्या होत्या. काशीनंद यांनी स्वबळावर काढलेल्या कॅसेट्सनाही देशभरात लोकप्रियता मिळाली.
दलित चळवळीतील प्रल्हाद शिंदे, वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप, विष्णू शिंदे, सुषमा देवी, राजानंद गडपायले, संगीतकार अशोक नायगावकर, मधुकर पाठक, नागोराव पाटणकर, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, जानीबाबू कव्वाल, प्रकाश पाटणकर आदींची सोबत त्यांना नेहमीच असायची.
कविवर्य सुरेश भट यांनी मराठीत आणलेला गझल प्रकार आणि काशीनंद यांचा ‘खमसा’ हे त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांच्या ८४ गीतांचा ‘निळ्या वेदना’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला होता.
बी. काशीनंद यांची अंत्ययात्रा त्यांच्या पांढराबोडी बुद्ध विहार येथील निवासस्थानाहून रविवारी दुपारी १ वाजता निघेल. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)