लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. नागपूरचे पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी (विशिष्ट सेवा पदक) व सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे (उल्लेखनीय सेवा पदक) यांच्यासह चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे.
तत्कालीन अपर पोलिस आयुक्त व डीआयजी प्रमोद शेवाळे, आर्थिक शाखेचे उपनिरीक्षक अनिल ब्राह्मणकर यांनादेखील उल्लेखनीय सेवा पदक घोषित झाले आहे. तसेच शहर पोलिस दलात पूर्वी तैनात असलेले व आता कुही पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकपदी कार्यरत रमेश ताजणे यांचाही समावेश आहे. रेड्डी यांनी अमरावती पोलिस आयुक्त पदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी यापूर्वी शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.
तंत्रज्ञानावर त्यांची चांगली पकड असून, अनेक गुन्हेगारांना त्यांनी वठणीवर आणले आहे. त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विशिष्ट सेवा पदक घोषित झाले आहे. नरेंद्र हिवरे यांना पोलिसांच्या अनेक शाखांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. ते सीताबर्डीसह अनेक महत्त्वाच्या ठाण्यांचे ठाणेदार होते. गँगस्टर संतोष आंबेकर प्रकरणातदेखील त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. उपनिरीक्षक ब्राह्मणकर यांनी शहर पोलिस दलाच्या अनेक शाखांमध्येही काम केले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.