मध्यवर्ती संग्रहालयाचे वैभव परतले
By Admin | Updated: May 18, 2016 03:17 IST2016-05-18T03:17:26+5:302016-05-18T03:17:26+5:30
एकेकाळी नागपूरची ओळख असलेला ‘अजब बंगला’ म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालयाने आता कात टाकली आहे.

मध्यवर्ती संग्रहालयाचे वैभव परतले
अत्याधुनिक स्वरूपातील दालने : चित्रकला व नागपूर हेरिटेजमुळे आकर्षणात भर
नागपूर : एकेकाळी नागपूरची ओळख असलेला ‘अजब बंगला’ म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालयाने आता कात टाकली आहे. गेल्या काही वर्षांत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे या संग्रहालयाचे रूप पालटले आहे. येथील दालनांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. चित्रकला दालन व नागपूर हेरिटेजमुळे येथील आकर्षणात भर पडली आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता या संग्रहालयाचे गतवैभव पुन्हा परतल्याचा प्रत्यय येतो.
ब्रिटिशांच्या काळात अॅन्टेक्वेरियन सोसायटी आॅफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूर येथे संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करावे, अशी संकल्पना पुढे आली. त्यानुसार नागपूरचे तत्कालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांच्या सूचनेंतर्गत कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीमध्ये मुख्य आयुक्तांशिवाय फादर रेव्हरंड हिस्लॉप तसेच इतर उच्चपदस्थ युरोपियन अधिकारी व नागपुरातील एकमेव भारतीय नाना अहीरराव यांचा समावेश होता. स्थापित कमिटीने सन १८६२ मध्ये निर्देशित व निश्चित केलेल्या जागेवर आज अस्तित्वात असलेल्या संग्रहालयाची इमारत बांधण्यात आली व सेंट्रल म्युझियम नागपूर या नावाने ७ मे १८६३ मध्ये हे संग्रहालय सुरू झाले.
ब्रिटिश काळात जी काही संग्रहालये निर्माण करण्यात आली त्यापैकी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय हे मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे हे १५३ वे वर्ष आहे. संग्रहालयात भूगर्भ व प्रागैतिहासिक, प्राणी (स्टफ), पक्षी, सरपटणारे प्राणी, आर्ट अॅण्ड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनांचा समावेश आहे.
संग्रहालयात नागपूर हेरिटेज दालन नव्यानेच सुरू झाले आहे. या दालनात नागपूर जिल्ह्यातील विविधा वारसा स्थळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. नागपूरच्या प्राचीन व आधुनिक स्थापत्यासोबतच मध्यवर्ती संग्रहालयाा दीडशे वर्षांच्या वाटचालीचा संक्षिप्त वृत्तांत सांगण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या नावाचे फलक लावले आहे. यात १८५७ व १९४२ च्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांचे नामस्मरण करण्यात आले आहे. काळाच्या ओघात झालेल्या बदलांचे वास्तविक चित्रण जुने आणि नवीन नागपूर या शोकेसमध्ये दर्शविण्यात आले आहे. यामध्ये सन १९६० ते १९७० च्या सुमारास नागपुरातील भारतीय रिझर्व्ह बँक, लक्ष्मीनारायण मंदिर, मध्यवर्ती संग्रहालय, रेल्वे स्टेशन इत्यादी प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे भूतकाळ आणि वर्तमानकाळ या पद्धतीने दाखविण्यात आली आहेत. संग्रहालय परिसरात लॅण्डस्केपिंग करून काही प्राचीन मूर्र्ती स्थापित करून नवीन दालने तयार करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या राणी व्हिक्टोरिया यांच्या दोन्ही संगमरवरच्या मूर्तीसुद्धा येथे स्थापित करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवनवीन कार्यक्रमांद्वारे पर्यटकांची संख्यासुद्धा कमालीची वाढली आहे. (प्रतिनिधी)