बौद्ध धम्माचे वैभव पुन्हा परतणार

By Admin | Updated: February 16, 2015 02:27 IST2015-02-16T02:27:02+5:302015-02-16T02:27:02+5:30

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आज जगभरात पोहोचला आहे. या धम्माच्या माध्यमातून जगाने प्रगती केली आहे, परंतु भारतातच हा धम्म रसातळाला गेला.

The glory of Buddhist dharma will be returned | बौद्ध धम्माचे वैभव पुन्हा परतणार

बौद्ध धम्माचे वैभव पुन्हा परतणार

नागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आज जगभरात पोहोचला आहे. या धम्माच्या माध्यमातून जगाने प्रगती केली आहे, परंतु भारतातच हा धम्म रसातळाला गेला. मात्र डॉ. आंबेडकरांच्या रूपाने भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन झाले असून भारतात बौद्ध धम्माला असलेले गतवैभव पुन्हा प्राप्त होईल, असा विश्वास थायलंडच्या राजकुमारी मॉम लुयाँग राजादारासिरी जेयानकुरा यांनी येथे व्यक्त केले.
बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे आयोजित जागतिक धम्म परिषद आणि सिद्धार्थ गौतम या चित्रपटाच्या विमोचनासाठी त्या नागपुरात आल्या आहेत. सायंकाळी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत श्रीलंकेचे भदंत बानागला उपतिस्स नायक थेरो, सिद्धार्थ गौतम चित्रपटाचे मुख्य अभिनेते गगन मलिक हे सुद्धा उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब अ२ांबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. गौतम बुद्धांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी भदंत बानागला उपतिस्स, भदंत सदानंद महाथेरो, सदानंद फुलझेले व्यासपीठावर होते.
आवाज इंडिया टीव्ही आणि डॉ. आंबेडकर स्मारक समिती यांच्यातर्फे हा संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राजकुमारी मॉम लुयाँग म्हणाल्या, भारत आणि थायलंडमधील बौद्ध धम्मगुरु एकमेकांच्या देशात येत-जात राहतात. त्यामुळे दोन्ही देशातील संस्कृतीचे आदानप्रदान होते. ही दोन्ही संस्कृतीच्या वाढीसाठी चांगली गोष्ट आहे. भारतातून बौद्ध धम्म जगभरात पसरल्याने बौद्ध राष्ट्रंमध्ये असलेल्या भारताबद्दल विशेष आकर्षण आहेत. तसेच आकर्षण थायलंडला सुद्धा आहे. थायलंडमध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी मोठे विद्यापीठ आहे. जगातील बौद्ध विद्वानांना तिथे शिकवण्यासाठी बोलाविले जाते.
त्याचप्रमाणे अनेक लहान-लहान अभ्यासक्रमसुद्धा चालविले जातात. त्याचप्रकारे शैक्षणिक केंद्र भारतातही निर्माण व्हावे. तसे प्रयत्न सुरू आहेत. बौद्ध धम्माच्या शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी आपण सर्वतोपरी मदत करायलाही तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजकुमारी मॉम लुयाँग यांनी इंग्रजीमध्ये नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गगन मलिक यांनी त्याचे हिंदी भाषांतर केले. एस.के. गजभिये, डॉ. सुनील तलवारे, विलास गजघाटे, नितीन गजभिये, चंद्रबोधी पाटील व्यासपीठावर होते. डॉ. राजेंद्र फुले यांनी प्रास्ताविक केले. आवाज इंडियाचे संचालक अमन कांबळे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The glory of Buddhist dharma will be returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.