राष्ट्रगीत वाजणे, तिरंगा फडकणे हा गौरवास्पद क्षण

By Admin | Updated: July 8, 2017 02:38 IST2017-07-08T02:38:40+5:302017-07-08T02:38:40+5:30

रितिका राहुल ठाकेर. अवघ्या १६ वर्षांची बॅडमिंटनपटू. पण झेप उत्तुंग. चार वर्षांच्या काळात रितिकाने या खेळात केलेली प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे.

The glorious moment is to be a national song and a tricolor | राष्ट्रगीत वाजणे, तिरंगा फडकणे हा गौरवास्पद क्षण

राष्ट्रगीत वाजणे, तिरंगा फडकणे हा गौरवास्पद क्षण

रितिका ठाकेर : आयव्हरी कोस्टच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविला दुहेरी मुकुटाचा मान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रितिका राहुल ठाकेर. अवघ्या १६ वर्षांची बॅडमिंटनपटू. पण झेप उत्तुंग. चार वर्षांच्या काळात रितिकाने या खेळात केलेली प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे. द. आफ्रिकेतील अबीदजान नुकत्याच झालेल्या सिनियर गटाच्या ‘आयव्हरी कोस्ट आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन’ रितिकाने पहिल्याच प्रयत्नात महिला एकेरी आणि दुहेरीमध्ये जेतेपद पटकाविले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचाविताच पुरस्कार सोहळ्यात तिरंगा फडकला व राष्ट्रगीताची धून वाजली. हा गौरव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे रितिकाने अभिमानाने सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना रितिकाने अनुभव कथन केले.ती म्हणाली,‘सिनियर गटात पहिल्यांदा खेळत असल्याची मनात भीती होती पण दडपण नव्हते. ज्युनिअर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभवाचा लाभ घेत मुक्तपणे खेळून अंतिम लक्ष्य गाठू शकले.
विश्व क्रमवारीत ८६ व्या स्थानावरील खेळाडूंशी उपांत्य फेरीत लढत चुरशीची झाली. प्रतिस्पर्धी खेळाडू प्रशिक्षकदेखील असल्यामुळे सामना संपल्यानंतर माझ्याकडून काही चुका झाल्या का, याबद्दल मार्गदर्शन घेतले.’ या स्पर्धेतील यशाचा लाभ पुढील वाटचालीसाठी होईल, असे सांगून रितिकाने प्रशिक्षक अजय दयाल व रॉबिन सायमन यांच्यासह जिल्हा बॅडमिंटन संघटना, शाळा व माध्यमांचे आभार मानले.
रितिका एकेरी व दुहेरी या दोन्ही प्रकारात खेळते. मुंबईची सिमरन सिंघी ही तिची दुहेरीतील सहकारी. गेली चार वर्षे दोघी एकत्र खेळत आहेत. भविष्यात यापैकी कोणत्या एका प्रकारावर लक्ष्य केंद्रित करशील, या प्रश्नावर रितिका म्हणाली, ‘मी दोन्ही प्रकारात ‘कम्फर्टेबल’ असून प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेईल.’ स्पेनची कॅरोलिना मारिन ही आपली आवडती खेळाडू असल्याचे सांगून रितिकाने २०२० पर्यंत आॅलिम्पिक खेळण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. याशिवाय विश्व ज्युनिअर बॅडमिंटन आणि ‘आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप’ खेळण्याची इच्छा रितिकाने व्यक्त केले.
सीडीएस शाळेतून ८७ टक्के गुणांसह नुकतीच आयसीएसई बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेली रितिका पुढे मानसोपचारतज्ज्ञ बनू इच्छिते. त्यासाठी ती कला शाखेत शिक्षण घेणार आहे.
नागपुरात बॅडमिंटन सुविधांबद्दल विचारताच म्हणाली, ‘स्थानिक सुविधांवर समाधानी आहे. प्रशिक्षणासाठी कुठेही जायची गरज नाही. येथे प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या प्रगतीला गती मिळण्यासाठी सर्वसुविधायुक्त अकादमी स्थापन व्हायला हवी. तज्ज्ञ प्रशिक्षक, आधुनिक ट्रेनिंग, फिजिओ व जिमची सुविधा असल्यास बॅडमिंटनपटूंना फायदाच होईल’. यावेळी वडील राहुल ठाकेर, प्रशिक्षक अजय दयाल व वायएमसीएचे महासचिव नीरजसिंग उपस्थित होते.

Web Title: The glorious moment is to be a national song and a tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.