‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ आजपासून

By Admin | Updated: November 21, 2015 03:21 IST2015-11-21T03:21:13+5:302015-11-21T03:21:13+5:30

एनआरआय असोसिएशन, नागपूर फर्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित वार्षिक ‘ग्लोबल नागपूर समिट - २०१५’ चे उद्घाटन उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता ....

'Global Nagpur Summit-2015' from today | ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ आजपासून

‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ आजपासून

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : स्मार्ट सिटीवर होणार चर्चा
नागपूर : एनआरआय असोसिएशन, नागपूर फर्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित वार्षिक ‘ग्लोबल नागपूर समिट - २०१५’ चे उद्घाटन उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्सिस्टंट सिस्टम्स आयटी पार्कच्या सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे व मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. यानंतर उद्घाटन सत्रात ‘स्मार्ट सिटी’ वर तीन पॅनल चर्चा होईल. यात सिस्टर सिटीज इंटरनॅशनलचे चेअरमन बिल बोएरम, फाऊंडेशन फॉर फ्युचरिस्टिकच्या संस्थापिका करुणा गोपाल, ब्रिटिश डिप्टी हाय कमिशन, मुंबईचे कुमार अय्यर व आॅस्ट्रेलियन कौन्सिलेटर जनरल मार्क पीअर्स सहभागी होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित एका समारंभात उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर व जागतिक स्तरावरील उद्योजकांना १४ कॅटेगरीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय रविवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पर्सिस्टंट सिस्टम्स आयटी पार्कच्या सभागृहात ‘किरकोळ पुरवठा साखळी’ यावर आयोजित पॅनल चर्चेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर लॉजिस्टिक्स, डिफेन्स, एअरोस्पेस, हेल्थकेअर व मेडिकल टुरिझम यावर चर्चा होणार असून, त्यात डिक्की स्किल अ‍ॅण्ड ईडीपी सेक्टर कौंन्सिलचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, क्राउडएराचे संस्थापक चेत जैन, निको डिफेन्स सिस्टम्सचे डायरेक्टर डी. पी. सरमा, इंडिया साऊथ आफ्रिका अ‍ॅण्ड मिडल ईस्ट, केल्डेरिसचे प्रबंध संचालक हकीमुद्दीन अली, न्यू क्रॉस हॉस्पिटल, युकेचे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट/लीड इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. संजीव पेटकर, केपीएमजी इंडियाचे पार्टनर अ‍ॅण्ड नॅशनल हेड उत्कर्ष पालनिटकर, युकेचे कन्सल्टंट शोल्डर, एलबो अ‍ॅण्ड हॅन्ड सर्जन डॉ. विशाल साहनी सहभागी होतील.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरात स्थायिक झालेले पण नागपूरशी विशेष नाते असलेल्या तीन तज्ज्ञांसह एकूण ४०० प्रतिनिधी भाग घेणार आहेत. (प्रतिनिधी)

नागपूर हे देशातील ‘व्हायब्रन्ट सिटी’
‘हॉटेल रॅडिसन्स ब्ल्यू’ चे महाव्यवस्थापक मनोज बाली यांचे मते, जागतिक स्तरावर नागपूर शहराची ओळख ‘आॅरेंज सिटी’ म्हणून आहे. एवढेच नव्हे तर नागपूरला भारतातील जोशपूर्ण शहर सुद्धा म्हणता येईल. गेल्या काही वर्षांपासून या शहराचा विकास वेगाने होत आहे. विकसनशील शहर म्हणून या शहराची भारतात ओळख आहे. त्यामुळे हे शहर जोशपूर्ण असल्याचे मला वाटते. टाटा, गोदरेज व एन्सारा या मोठ्या समूहांनी शहरात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आज हे शहर प्रत्येकाला आवडीचे वाटू लागले आहे.

नागपूर वेगाने विकसित होणारे शहर

लक्झोरा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.च्या सहायक उपाध्यक्षा (विक्री व विपणन) वंदना रघुवंशी यांचे मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार नागपूरकडे आकर्षित होत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन घराची खरेदी ही नागपूरकरांसाठी जमेची बाजू आहे. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेने जवळपास २५०० कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत.याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात आयआयएम आणि आयआयटी या राष्ट्रीयस्तरीय संस्था येत आहेत. तसेच नागपूरचा विकास तांत्रिक हब म्हणूनही होत आहे. मिहानमध्ये टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टेक महिन्द्रचा शुभारंभ झाला असून इन्फोसिसचेही कार्यान्वयन लवकरच सुरू होणार आहे.

स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट युनिव्हर्सिटीची’ भूमिका महत्त्वाची
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या मते, कुठल्याही शहराच्या विकासात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. नागपूरला स्मार्ट बनविण्याच्या संकल्पनेपासून विद्यापीठ दूर नाही. त्यामुळे स्मार्ट शहरात स्मार्ट युनिव्हर्सिटीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नागपूरमध्ये स्मार्ट सिटी बनविण्याची संकल्पना तयार झाल्यानंतर विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे. शहराच्या विकासाशी जुळलेल्या सर्व कामाची सुरुवात विद्यापीठातून होणे गरजेचे आहे. यातून एक चांगला संदेश जाईल.

२०२० पर्यंत ‘ग्लोबल नागपूर’
नागपूर फर्स्टचे अध्यक्ष दिनेश जैन यांच्या मते, नागपूर ‘ग्लोबल सिटी’ बनू शकते. मात्र त्यासाठी जागतिक संघटनेने नागपुरात आपले मुख्यालय बनविले पाहिजे किंवा या संघटनेने येथून जागतिक स्तरावर कार्य करावे, अथवा काही ग्लोबल सिटी पार्टनरनी नागपूरसोबत मिळून या शहराला ‘ग्लोबल सिटी’ बनवावे. नागपूर फर्स्ट या सर्व पर्यायांवर काम करीत आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, की २०२० पर्यंत नागपूरला ग्लोबल सिटी बनविण्याचे आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. जैन हे शिकागो शेजारच्या नेपरविल येथील रहिवासी आहेत. त्यांनी जगभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच ज्यांचा नागपूरशी विशेष संबंध आहे, अशा ५० लोकांना एकत्रित केले आहे.

Web Title: 'Global Nagpur Summit-2015' from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.