ंअॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा
By Admin | Updated: November 27, 2015 03:06 IST2015-11-27T03:06:44+5:302015-11-27T03:06:44+5:30
‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे...

ंअॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा
इस्पिळांमध्ये दरपत्रकच नाही : गरीब रुग्णांची लूट
नागपूर : ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र शहरात याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप आले आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाणे किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेणे जिकरीचे झाले आहे. विशेष म्हणजे, अॅम्ब्युलन्स चालकांच्या या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरवून दिले होते. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मारुती रुग्णवाहिकेच्या पहिल्या २५ कि.मी. पर्यंत ४०० रुपये दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मेडिकल, मेयोपासून ते मनपाच्या इस्पितळांसह आरोग्य विभागाच्या एकाही इस्पितळात या दरपत्रकाचे फलक लावण्यात आले नसल्याने गरीब रुग्णांची सर्रास लूट सुरू आहे.
सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला अॅम्ब्युलन्सचा धंदा शहरात इतर व्यवसायाप्रमाणेच बहरला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण झाले आहे, परिणामी गरीब व गरजुंकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे. अॅम्ब्युलन्स चालक ५० कि.मी.अंतरावरील गावात जाण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारतात. काही तर अॅडव्हान्स पेमेंट घेऊन अॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून येतो असे सांगून पसार होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या वर्षी याची दखल प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरने घेतली. कार्यालने रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरवून दिले. शहराच्या हद्दीमध्ये पहिल्या २५ कि.मी.पर्यंत रुग्णवाहिका मारुती असेल तर ४०० रुपये, टाटासुमोला ४५० रुपये, विंगरला ५०० तर टेम्पो ट्रव्हलरला ६०० रुपये दर ठरविले. वातानुकूलित यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमूद दरात १० टक्के वाढ ठरवून दिली. महापालिकेच्या आत व हद्दीबाहेर २५ कि.मी. नंतरच्या प्रत्येक कि.मी. करिता रुग्णवाहिका मारुतीला नऊ, टाटासुमोला दहा, विंगरला अकरा तर टेम्पो ट्रव्हलर तेरा रुपये दर ठरविण्यात आले होते. याची माहिती आरटीओ कार्यालयाने मेडिकल, मेयो, महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य सेवा मंडळाला पत्रातून दिली. यात अॅम्ब्युलन्सचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु वर्षे झालीत एकाही रुग्णालयाने हे दरपत्रक लावले नाही. परिणामी, अॅम्ब्युलन्स चालकांचा रुग्ण लुबाडणुकीचा धंदा तेजीत सुरू आहे.