जादूची झप्पी देताय... सांभाळून रे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST2021-02-12T04:09:32+5:302021-02-12T04:09:32+5:30
नागपूर : मेंदू जड व्हायला लागताे, हृदय धडधडायला लागते. निर्विकाराप्रमाणे स्वत:ला शून्यत्वाची प्रचीती त्या क्षणाला हाेते. आपण नवजात बालकाप्रमाणे ...

जादूची झप्पी देताय... सांभाळून रे बाबा
नागपूर : मेंदू जड व्हायला लागताे, हृदय धडधडायला लागते. निर्विकाराप्रमाणे स्वत:ला शून्यत्वाची प्रचीती त्या क्षणाला हाेते. आपण नवजात बालकाप्रमाणे ममत्वाचा एखादा खंबीर आधार शाेधत असताे. ही अतिशय पवित्र भावना असते. म्हणूनच आपल्या विश्वासाच्या व्यक्तीला घट्ट आलिंगन देऊन काही क्षण निवांत राहावेसे वाटते. मग त्या शून्यातून बाहेर पडत नवे प्रवाह वाहायला लागतात. त्यासाठीच हे आलिंगन महत्त्वाचे असते. त्या मुन्नाभाईच्या शब्दात हीच तर असते ‘जादू की झप्पी’. आज ताे जादूच्या झप्पीचा दिवस म्हणजेच ‘हग डे’. प्रियकरांसाठी तसा हा दिवस खासच; पण मित्रहाे, आलिंगन देताय का... पण जरा सांभाळूनच. कारण काेराेनाचा ससेमिरा अजून संपायचा आहे.
व्हॅलेंटाइन विकमध्ये राेज डे, चाॅकलेट डे, टेडी डे, प्रपाेज डे साजरे झाले. हे सगळे दिवस विशिष्ट भावना साजरे करणारे दिवस हाेत. जनू प्रेम या प्रक्रियेला पूर्णत्व प्रदान करणाऱ्या पायऱ्याच हाेत. प्रेमात निर्माण हाेणाऱ्या प्रत्येक भावनांशी हे दिवस निगडित आहेत. त्याच प्रक्रियेत येणारा आलिंगन या कृतीचे महत्त्व अधाेरेखित करणारा दिवस म्हणजे ‘हग डे’. आलिंगनाची कृतीच निराळी. आई जशी नवजात मुलाला कवटाळून घेते, तेव्हा ते निवांत असते. जरा का तिने दूर केले की ते रडायला लागते. त्याचे रडणे म्हणजे ‘ये आई मला कवटाळून घे ना’, ही त्याची भावना आपण सहज समजून घेताे. त्या कवटाळण्याने आलिंगनाचे महत्त्व समजून येते. मानवाच्या प्रत्येक कृतीला गहिवर असते, गांभीर्य असते. भावना जेव्हा उत्कट हाेतात, तेव्हा सहजगत्या घडणाऱ्या कृतीला संवेदनेची झालर असते.
जादूची झप्पी तशी सर्वांसाठीच हवीहवीशी असते. प्रियकरांसाठी तर यापेक्षा दुसरा भावनेचा सुवर्ण क्षणच नसावा. आपल्या प्रियकराच्या बाहूत शिरून घट्ट मिठी मारली की सारे जगच विसरायला हाेते; पण ही झप्पी केवळ प्रेमीयुगलांसाठीच महत्त्वाची नाही बर. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्राचे आलिंगनही साेबतीचे अनेक क्षण आठवणारेच असतात. एखाद्या मित्राला कशाचे तरी टेन्शन असले की मित्राच्या आलिंगनाने ‘मै हू ना’ असा आधार निर्माण करते. चिंतेच्या, प्रेमाच्या, आनंदाच्या अशा प्रत्येक भावनेत ममत्वाचे, जिव्हाळ्याचे आलिंगन माेलाचे असते. दुर्दैवाने गेल्या वर्षीच्या काेराेनामुळे या आलिंगनाला मर्यादा आल्या. म्हणून ‘हग डे’च्या या दिवशी तुम्हालाही मर्यादा पाळायच्या आहेत, हे विसरू नका. त्यापेक्षा झाडांना, आवडत्या घरच्या श्वानाला आलिंगन द्याच. हात पसरून या निसर्गालाही कवटाळून घ्या. हे सारे तर प्रेमाचे साेबतीच आहेत ना. काय मग, देणार ना जादू की झप्पी...