तुमचे दागिने द्या अन् दोन लाख घ्या; लोभ नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 15:41 IST2020-12-18T15:41:21+5:302020-12-18T15:41:43+5:30
Nagpur News तुम्ही हे दोन लाख घ्या, बदल्यात तुमच्या जवळचे किरकोळ दागिने आम्हाला द्या, असे म्हणत दोन भामट्यांनी दोन महिलांची फसवणूक केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.

तुमचे दागिने द्या अन् दोन लाख घ्या; लोभ नडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमच्याजवळ दोन लाख रुपये आहेत. मात्र, सहकारी गतिमंद असल्याने या नोटांचा वापर कसा करायचा, ते कळत नाही. त्यामुळे तुम्ही हे दोन लाख घ्या, बदल्यात तुमच्या जवळचे किरकोळ दागिने आम्हाला द्या, असे म्हणत दोन भामट्यांनी दोन महिलांची फसवणूक केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.
कळमन्याच्या डिप्टी सिग्नल भागात राहणाऱ्या दुर्गा रवी शाहू (वय २७) आणि त्यांची मैत्रीण सुनीता शाहू गुरुवारी दुपारी लकडगंजमधून जात होत्या. रस्त्यात त्यांना दोन भामटे भेटले. बुटीबोरी येथून किती दूर आहे, असा प्रश्न करून आरोपींपैकी एकाने त्यांच्याशी जवळीक साधली. माझ्या सोबतचा व्यक्ती गतिमंद आहे. त्याच्याजवळ दोन लाखांची रोकड आहे. या रकमेचा आम्हाला काहीच फायदा नाही. ती तुम्ही ठेवून घ्या, असे म्हणत आरोपीने दुर्गा आणि सुनीता शाहूला आमिषाच्या जाळ्यात ओढले. पिशवीतून नोटांचे बंडलही दाखवले. बंडलावरची कोरी करकरीत नोट पाहून या दोघींना लोभ सुटला. त्यांनी ते बंडल स्वत:जवळ घेतले आणि स्वत:जवळचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल आरोपींना दिले. आरोपी तेथून सटकले. काही अंतरावर कपड्यात गुंडाळून असलेले बंडल उघडून पाहिले असता त्यावरची एकच नोट आणि खाली कागदाचे तुकडे असल्याचे त्यांना दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघींनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---