सुमनविहार, भिलगावला तात्काळ पाणी द्या
By Admin | Updated: April 18, 2017 02:15 IST2017-04-18T02:15:39+5:302017-04-18T02:15:39+5:30
सुमनविहार व भिलगाव या शहरालगत व कामठी तालुक्यात असलेल्या गावांना तात्काळ पाणी द्या.

सुमनविहार, भिलगावला तात्काळ पाणी द्या
पालकमंत्री : मनपा देणार सात लाख लिटर पाणी
नागपूर : सुमनविहार व भिलगाव या शहरालगत व कामठी तालुक्यात असलेल्या गावांना तात्काळ पाणी द्या. सध्या एका टाकीला जोडून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
उत्तर नागपुरातील वांजरा येथील पाण्याची टाकी पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही गावांना महापालिका पाणी देणार आहे. त्यासाठी सात लाख लिटर पाणी आरक्षित आहे. या टाकीचे काम नासुप्र करीत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी एक टाकी त्वरित जोडा. वांजरा टाकी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित टाक्यांना जोडण्यात येणार आहे. भिलगाव येथील २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा मंजूर असून या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)
खापरी, शिवणगावात माफक दरात घरे
मिहान प्रकल्पात जाणाऱ्या खापरी, शिवणगाव येथे प्रकल्पग्रस्तांना भूखंड आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांसाठी माफक दरात घरांची योजना बांधण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
सुमारे ५०० घरे येथे बांधण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे सहकार्य आणि मिहानच्या सहकार्याने या नागरिकांना ५०० चौ.फुटाचे घर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुनर्वसनासाठी मिहानने त्वरित शासनाकडे पैसे भरले तर सेक्शन ४ ची कारवाई १५ दिवसात सुरू करता येईल, असेही पुनवर्सन विभागातर्फे सांगण्यात आले.
सुरक्षा रक्षकांना नियमित वेतन
महावितरण अंतर्गत बुटीबोरी, सावनेर येथील सुरक्षा रक्षकांना त्यांचे थकीत असलेले वेतन येत्या तीन दिवसात देण्यात येईल. तसेच यापुढे नियमित वेतन मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन या सुरक्षा रक्षकांना मिळालेले नाही, हे येथे उल्लेखनीय. ऊर्जामंत्र्यांनी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून तीन दिवसात या रक्षकांचे वेतन देण्याचे निर्देश दिले.