१५ रुपये द्या,घरपोच प्रमाणपत्र मिळवा
By Admin | Updated: December 24, 2016 02:44 IST2016-12-24T02:44:38+5:302016-12-24T02:44:38+5:30
उत्पन्नाचा दाखला असो की जातीचे प्रमाणपत्र, आपल्याला हे प्रमाणपत्र आता थेट घरपोच उपलब्ध होणार

१५ रुपये द्या,घरपोच प्रमाणपत्र मिळवा
जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : १ जानेवारीपासून सेतूमध्ये सुरुवात
नागपूर : उत्पन्नाचा दाखला असो की जातीचे प्रमाणपत्र, आपल्याला हे प्रमाणपत्र आता थेट घरपोच उपलब्ध होणार आहे, त्यासाठी केवळ १५ रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. होय हे खरे आहे, येत्या १ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयाद्वारे ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उत्पन्नचे दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, शपथपत्र, अधिवास व राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सिटी सर्व्हे आदींसह विविध कामांसाठी नागरिकांची ये-जा असते. विद्यार्थ्यांपासून तर पालकांपर्यंत आणि नोकरदारापासून तर शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावेच लागते. तसेच ते जिल्ह्याचे मुख्यालय सुद्धा आहे. त्यामुळे शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा ओढा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतो. परंतु शासकीय काम आणि वर्षभर थांब असाच काहिसा अनुभव नागरिकांना येतो.
यातून मार्ग काढण्यासाठी अनेकजण मध्यस्त, दलालांची मदत घेतात, नागरिकांची कामे तातडीने होतातही, परंतु पुढे मात्र अडचणींचाच सामना करावा लागतो.
यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अलीकडे अनेक अभियान सुरू केले आहेत. शासनानेही सेवा हमी कायदा लागू केला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्रे नागरिकांना वेळेत मिळू लागली आहेत. याशिवाय अनेक गोष्टी आॅनलाईन सुद्धा सुरु आहेत. तसेच शासन व प्रशासनातर्फे विविध शिबिरे सुद्धा सुरू आहे. यामुळे नागरिकांची कामे होत आहेत.
त्यामुळे मध्यस्तांवर थोडे नियंत्रण मिळविता आले आहे. काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या पुढाकाराने एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे प्रत्येक व्यक्तीला एसएमएसद्वारे त्याच्या प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रमाणपत्राची यथायोग्य माहीत मिळत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे.
यापुढे आणखी एक पाऊल टाकत आता घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. सेतू कार्यालयाद्वारे उपलब्ध विविध प्रमाणपत्रे नागरिकांना आता घरपोच उपलब्ध होतील. यासाठी त्यांना केवळ १५ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. येत्या १ जानेवरीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.(प्रतिनिधी)