धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:57 PM2017-12-22T19:57:46+5:302017-12-22T20:00:33+5:30

धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचा मोर्चा शुक्रवारी विधिमंडळावर मोठ्या संख्येत धडकला.

Give Reservation for Scheduled Castes to Dhobi Community | धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

Next
ठळक मुद्देराज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचा मोर्चा : ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिली भेट

आॅनलाईन लोकमत
नागपूर : धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाचा मोर्चा शुक्रवारी विधिमंडळावर मोठ्या संख्येत धडकला. या मोर्चाला ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन लाँड्री व्यवसायातील वीजदरात सवलत देण्याचे आश्वासन दिले. मोर्चाचे शिष्टमंडळ सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्यमंत्री कांबळे यांनी १५ जानेवारीपर्यंत डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ हे भजन गात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धोबी बांधव गणेशपेठ येथील चाचा नेहरू बालभवनात एकत्र झाले. येथून हा मोर्चा अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय  अध्यक्ष बालाजी शिंदे व उपाध्यक्ष देवराव सोनटक्के यांच्या नेतृत्वात निघाला. या मोर्चात साधारण पाच हजारावर धोबी बांधव सहभागी झाले होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशीचा हा सर्वात मोठा मोर्चा ठरला. मोर्चात लहान मुले संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. मोर्चाला टेकडी रोडवर पोलिसांनी थांबविले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अंगातील शर्ट काढून मागण्या रेटत लक्ष वेधले. या मोर्चाला खा. अशोक नेते, आ. संजीव रेड्डी, आ. रवी राणा, आ. बाळासाहेब सिरसकर व डॉ. डी.एम. भांडे यांनी भेट देऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मोर्चाचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन घेऊन जाणार नाही तर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मोर्चात येऊन निवेदन स्वीकारावे या अटीवर मोर्चा अडून बसला. दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. त्यांनी धोबी समाजाच्या मागण्यांसाठी या पूर्वीही पाठपुरावा केला असल्याचे सांगून मोर्चाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्याशी भेट घालून देतो, असे बोलताच मोर्चेकºयांनी याला विरोध केला. सामाजिक न्याय मंत्र्यांनी येथे येऊन निवेदन स्वीकारावे, त्या शिवाय जागा सोडणार नाही, अशी नारेबाजी सुरू झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर एक शिष्टमंडळ बावनकुळे यांच्यासोबत जाऊन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी डॉ. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्राला पाठविण्याचे आश्वासन दिले. मोर्चात तरुणांसोबत महिलांची संख्या लक्षणीय होती. डॉ.डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीसह केंद्राला पाठवा, संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, पारंपरिक लाँड्री उद्योजकाला वीजदरात सवलत द्या, संत गाडगेबाबा कर्मभूूमी स्मारक समिती श्रीक्षेत्र ऋणमोचन अमरावती संस्थेला स्मारक उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून द्या आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.
लाँड्री व्यवसायासाठी वेगळे दर-बावनकुळे
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोर्चाला भेट देत त्यांनी पारंपरिक लाँड्री उद्योजकाला वीज दरात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, पुढील आर्थिक वर्षात लाँड्री उद्योगाला लघु व्यवसायात समाविष्ट करून या व्यवसायासाठी विजेचे वेगळे दर ठरविण्यात येतील.

Web Title: Give Reservation for Scheduled Castes to Dhobi Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.