रोजी द्या किंवा दुकाने उघडू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:24+5:302021-04-09T04:08:24+5:30
नागपूर : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शासनाने सलून दुकानांवर ३० एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहेत. एवढे दिवस व्यवसायाशिवाय काढणे म्हणजे उपासमारीला ...

रोजी द्या किंवा दुकाने उघडू द्या
नागपूर : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शासनाने सलून दुकानांवर ३० एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहेत. एवढे दिवस व्यवसायाशिवाय काढणे म्हणजे उपासमारीला निमंत्रण आहे. शासनाने या काळात सर्व सलून कारागीर व दुकानदारांना रोजी द्यावी, अन्यथा आम्हाला दुकान उघडण्याची परवानगी देऊन जीवन जगण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी नाभिक एकता मंच शहर कार्यकारिणीच्या वतीने जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
मागील ७ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य केले. या काळात व्यावसायिकांची प्रचंड उपासमार झाली. नागपूर शहरात दोघांनी आत्महत्या केल्या. त्या काळात बसलेली आर्थिक झळ कायम असताना पुन्हा दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, कुटुंबाचे पोषण करण्यासाठी या काळात शासनाने सर्व दुकानदार, कारागिरांना मजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत शासनाने यावर सकारात्मकपणे निर्णय न दिल्यास कायद्याला झुगारून दुकाने उघडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. एकता मंचचे संस्थापक-अध्यक्ष धनराज वलुकार यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष अमोल आंबूलकर, जिल्हा महिला अध्यक्ष भाग्यलता तळखंडे, सचिव राजू तळखंडे, मनीषा पापडकर, मोरेश्वर कुकडकर, मुरलीधर गतफणे, संजय चांदेकर, संजय मानकर, विक्की साबळे, लक्ष्मण सराटे, रवी लंगे, भूषण खातखेडे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.