महाराष्ट्राला सोडून बिहारला ‘पॅकेज’ का दिले?

By Admin | Updated: October 12, 2015 02:53 IST2015-10-12T02:53:36+5:302015-10-12T02:53:36+5:30

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

Give Maharashtra a 'package' to leave Maharashtra? | महाराष्ट्राला सोडून बिहारला ‘पॅकेज’ का दिले?

महाराष्ट्राला सोडून बिहारला ‘पॅकेज’ का दिले?

संजय निरुपम : उत्तर भारतीय सभेचे वार्षिक अधिवेशन
नागपूर : महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. महाराष्ट्रातील बळीराजाला दिलासा देण्याची गरज असताना केंद्र शासनाने बिहारला कसे काय विशेष ‘पॅकेज’ दिले, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कस्तुरचंद पार्क येथे उत्तर भारतीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला छत्तीसगड येथील खासदार ताम्रध्वज साहू, प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी, छत्तीसगडमधील अभिनेते ‘राजा छत्तीसगडिया’ ऊर्फ अनुज शर्मा, ज्येष्ठ पत्रकार सुमित अवस्थी, नरेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यासाठी विशेष ‘पॅकेज’ द्यायला हवे होते. परंतु असे न करता राज्य शासनाने दुष्काळ कराच्या नावाखाली इंधनावर कर लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत किती जिल्हे दुष्काळप्रभावित आहेत याची घोषणा शासनाने केलेली नाही, असे निरुपम म्हणाले. उत्तर भारतीय सभेचे काम राजकीय नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक आहे.
उत्तर भारतीयांच्या सन्मानाची जपणूक करत असतानाच इतर भाषिक नागरिकांनाही योग्य मान दिला जातो. परंतु काही लोकांकडून भाषेच्या नावाखाली राजकारण करण्यात येते. सर्व भाषांचा सन्मान होणे आवश्यक आहे.
परंतु जर कोणी भाषा, प्रांत, जात यांच्या नावाखाली एकता तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवे असे आवाहन निरुपम यांनी उपस्थितांना केले. यावेळी दंदे फाऊंडेशनचे संचालक अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार संजय तिवारी, निवृत्त पोलीस अधिकारी रामलखन यादव, समाजसेवक पुरुषोत्तम लोणारे, राधेश्याम सारडा, शैलेश अवस्थी, अ‍ॅड. सुरेश शुक्ला, डॉ. हरविंदर गांधी, उमेश शाहू, जफर अहमद खान, गुणवंत विद्यार्थी कमल शाहू, मनोज पांडे, उमेश शाहू यांचा समाजगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले व विदर्भातील सभेच्या कार्याची माहिती दिली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सभेतर्फे जिल्हाधिकारी कोषात ५१ हजार रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. मालिनी अवस्थी व अनुज शर्मा यांनीही आपल्या कलेचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: Give Maharashtra a 'package' to leave Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.