हुडकेश्वरमधील मुली भोपाळला
By Admin | Updated: July 17, 2015 03:24 IST2015-07-17T03:24:14+5:302015-07-17T03:24:14+5:30
रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या हुडकेश्वरमधील दोन मुली अवघ्या ४८ तासात पोलिसांनी शोधल्या.

हुडकेश्वरमधील मुली भोपाळला
‘आॅपरेशन मुस्कान’ चे फलित: सुखरूप पालकांच्या हवाली
नागपूर : रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या हुडकेश्वरमधील दोन मुली अवघ्या ४८ तासात पोलिसांनी शोधल्या. त्यांना भोपाळला ताब्यात घेतल्यानंतर पालकांच्या सुखरूप हवाली करण्यात आले. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’चे हे फलित होय.
क्षुल्लक कारणावरून राग आल्यामुळे हुडकेश्वरमधून रविवारी सायंकाळी दोन चुलतबहिणी बेपत्ता झाल्या. एक २२ वर्षांची आणि दुसरी १४ वर्षांची आहे. अचानक मुली बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या पालकांना जबर धक्का बसला.
सर्वत्र शोधाशोध करूनही काही पत्ता लागेना. त्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली, नंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांची भेट घेतली. सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाचे प्रमुख बाजीराव पोवार यांनी लगेच सायबर सेलच्या माध्यमातून मुलींचे मोबाईल लोकेशन काढले. त्या भोपाळला असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, मुलीचा भाऊ भोपाळला नेहरूनगरात राहतो. मात्र तो मुंबईला गेला होता. त्यामुळे या मुलींच्या सुरक्षेची चिंता साऱ्यांनाच सतावू लागली होती. मात्र, भोपाळ पोलिसांच्या मदतीने त्यांना तेथे ताब्यात घेण्यात आले, नंतर पोलिसांचे एक पथक पालकासह भोपाळला पोहोचले. ही सर्व मंडळी मुलींना सुखरूप घेऊन बुधवारी नागपुरात आली. त्यामुळे पालक आणि त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आनंदीआनंद आहे.(प्रतिनिधी)
पारडीतील मुलगा दिघोरीत
बुधवारी एक शाळकरी मुलगा (वय १०, रा. पारडी) वाईट सवयीच्या मुलासोबत दिघोरीत पोहोचला. रात्रीचे ९ वाजले. मुलगा शाळेतून घरी परतला नाही म्हणून घाबरलेल्या पालकांनी कळमना ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, एका पत्रकाराने दिघोरीत एक शाळकरी मुलगा संशयास्पद अवस्थेत असल्याचे पोलिसांना कळविले. गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहचले आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पालकांच्या हवाली केले.