तरुणीचा डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
By Admin | Updated: March 13, 2017 02:29 IST2017-03-13T02:29:19+5:302017-03-13T02:29:19+5:30
आरोग्य तपासणी करताना डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप एका रुग्ण तरुणीने (वय २३) लावला.

तरुणीचा डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
तपासणी करताना लज्जास्पद वर्तन : डॉक्टरने फेटाळला आरोप
नागपूर : आरोग्य तपासणी करताना डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप एका रुग्ण तरुणीने (वय २३) लावला. त्यामुळे इमामवाडा पोलिसांनी रामबागमधील डॉ. पंकज पाटील (वय ३७) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
तक्रारकर्ती तरुणी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. ती आणि डॉ. पाटील एकाच वस्तीत राहतात. तरुणीच्या तक्रारीनुसार, ती रामबागमधील केंद्रीय स्वास्थ्य योजना युनिट क्रमांक ५ मध्ये शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी गेली होती. तिचे वडीलही यावेळी सोबत होते. तपासणी करीत असताना डॉक्टरने नको त्या जागी आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. बाहेर आल्यानंतर तरुणीने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे तरुणीचे वडील अन् डॉक्टरमध्ये बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक आणि आरोप-प्रत्यारोपानंतर तरुणीने इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन डॉक्टरविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी डॉ. पाटील विरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली असता त्यांनी आरोप फेटाळून लावला. घटनेच्या वेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती. तरुणीला तपासताना आपल्या आजूबाजूला एका महिलेसह दोन कर्मचारी होते, असा दावा करून डॉक्टरने जुन्या एका प्रकरणामुळे आपल्याविरुद्ध खोटा आरोप लावण्यात आल्याचा प्रत्यारोप केला. प्रकरणातील गुंतागुंत वाढल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे. घटनेच्या वेळी तेथे असलेल्या रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविल्यानंतर या प्रकरणात पोलीस कारवाई करणार असल्याचे ठाणेदार अनिल कातकडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)