मैत्रिणीनेच केली दगाबाजी
By Admin | Updated: July 6, 2014 00:55 IST2014-07-06T00:55:06+5:302014-07-06T00:55:06+5:30
नेहमी घरी येणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड तसेच अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरीची घटना घडली.

मैत्रिणीनेच केली दगाबाजी
पाच लाखांची रोकड अन् दागिने लंपास : चोरीचा गुन्हा दाखल
नागपूर : नेहमी घरी येणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीच्या घरातून पाच लाखांची रोकड तसेच अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी चोरीची घटना घडली. फिर्यादी गौतम किसनराव भटकर (वय ३६) यांच्या पत्नी सुषमा यांची मैत्रीण नेहमी त्यांच्याकडे येत होती. ३ जुलैलासुध्दा ती सुषमाकडे आली. ती गेल्यानंतर सुषमा यांनी कपाट उघडून बघितले असता त्यातील पाच लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने (किंमत २ लाख, ४० हजार) दिसले नाही. सुषमा यांनी पतीला ही बाब सांगितली. नंतर भटकर दाम्पत्याने संशयित महिलेला विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भटकर दाम्पत्याने सोनेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, तिची चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडे तक्रार जाणार असल्याचे कळताच आरोपी महिलेने भटकर दाम्पत्याविरुद्धच तक्रार करून त्यांना फसवण्याची धमकी दिली. सोनेगाव पोलिसांनी दोन्ही बाजू पडताळल्यानंतर आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिने चोरलेले सोने मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवल्याचे समजते. (प्रतिनिधी)