लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रियकराच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या एका युवतीने स्वत:ला जाळून घेतले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही करुणाजनक घटना घडली. शुक्रवारी याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर आशिष उईके (वय २१, रा. मंगळूर डोंगरगाव, बुटीबोरी) आणि त्याचा साथीदार चान्सी मेश्राम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायली राजू बागडे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे.सायली आणि आरोपी आशिष एकाच गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी सायली वाडीला राहायला आली. मात्र, त्यांचे भेटणे, बोलणे सुरूच होते. दरम्यान, आशिष याचे अन्य दोन मुलींसोबतही प्रेमसंबंध असल्याचे सायलीला कळले. त्यामुळे तिने त्याला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. सायली आपल्या संबंधात अडसर ठरल्याचे लक्षात आल्याने आरोपी आशिष चिडला होता. तो त्याचा मित्र चान्सी याला घेऊन २ आॅक्टोबरला सायंकाळी ४.३० च्या सुमारास सायलीच्या वाडीतील घरी आला. यावेळी आरोपीने सायलीशी वाद घातला. तू माझ्या जीवनातून निघून जा, नाही तर मी तुला मारून टाकेन, अशी धमकी दिली. अश्लील शिवीगाळ करून मारहाणही केली. ते पाहून सायलीची काकू मध्ये आली असता आरोपी आशिषने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर ८ आॅक्टोबरला पुन्हा आरोपी आशिष पुन्हा सायलीकडे आला आणि त्याने तिच्याशी वाद घातला. त्याच्याकडून झालेली धोकेबाजी आणि अपमान असह्य झाल्यामुळे सायलीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचाराकरिता तिला मेयोत भरती केले असता तिचा ९ आॅक्टोबरला मृत्यू झाला. प्रारंभी वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतरच्या तपासात उपरोक्त घटनाक्रम पुढे आला. त्यामुळे सायलीची बहीण रुशिका राजू बागडे (वय १६) हिने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी वाडी पोलिसांनी आरोपी आशिष उईके आणि चान्सी मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:09 IST
प्रियकराच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या एका युवतीने स्वत:ला जाळून घेतले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही करुणाजनक घटना घडली.
नागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या
ठळक मुद्देनागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या